दहा वर्षात पहिल्यांदाच सिरियन नेत्यांचा सौदी दौरा

सौदी दौरादमास्कस – सिरियाचे पर्यटनमंत्री मुहम्मद मार्तिनी यांनी सौदी अरेबियाचा दौरा केला. 2011 साली सौदीने सिरियाचा बहिष्कार केल्यानंतर सिरियन नेत्याने सौदीचा केलेला हा पहिला दौरा ठरतो. दरम्यान, सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-अस्साद सौदीबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती समोर येत आहे. तर सौदी देखील सिरियाला अरब लीगमध्ये सामील करून घेणार असल्याच्या बातम्या आखाती माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहेत.

सौदी दौरासौदीबरोबर निर्माण झालेला तणाव संपवून नव्याने सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी सिरियन सरकार प्रयत्न करीत आहे, अशी माहिती राष्ट्राध्यक्ष अस्साद यांच्या राजकीय व माध्यम सल्लागार बौथाईना शाबान यांनी स्थानिक रेडिओशी बोलताना दिली. पर्यटनमंत्री मार्तिनी यांचा सौदी दौरा देखील यावर आधारलेला होता. येत्या काळात सिरिया व सौदीच्या नेत्यांमधील भेटीगाठी वाढतील, असे संकेतही शाबान यांनी दिले.

या महिन्याच्या सुरुवातीला सौदीच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख खालद अल-हुमौदान यांनी सिरियाला भेट देऊन राष्ट्राध्यक्ष अस्साद यांच्याशी चर्चा केली होती. या भेटीचे तपशील प्रसिद्ध झालेले नाहीत. पण काही दिवसांपूर्वी तुर्कीसंलग्न गटांनी सिरियात केलेल्या हल्ल्यांवर सौदीने टीका केली होती. याशिवाय सौदी दमास्कसमधील आपला दूतावास नव्याने सुरू करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत.

leave a reply