चीनच्या लढाऊ विमानांच्या घुसखोरीनंतर तैवानने क्षेपणास्त्र यंत्रणा कार्यान्वित केली

तैपेई – चीनच्या तब्बल नऊ लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केली. तैवानने देखील क्षेपणास्त्र यंत्रणा कार्यान्वित करून याला सडेतोड उत्तर दिले. गेल्या काही दिवसांपासून चीनने तैवानच्या हद्दीतील आपल्या विमानांची घुसखोरी वाढविली आहे. अमेरिकेत झालेल्या सत्ताबदलानंतर चीनने तैवानबाबत अधिक आक्रमक भूमिका स्वीकारल्याचे दिसत आहे.

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी चीनच्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’च्या नऊ विमानांनी तैवानच्या ‘एअर डिफेन्स आयडेन्टिफिकेशन झोन’मध्ये घुसखोरी केली. यामध्ये चार जे-१६ लढाऊ विमाने, चार जेएच-७ बॉम्बर विमाने आणि इलेक्ट्रॉनिक युद्धासाठी वापरल्या जाणार्‍या ‘वाय-९’ विमानाचा समावेश होता. या विमानांनी तैवानच्या नैऋत्येकडील हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने केला. या महिन्यातील चीनच्या विमानांची आतापर्यंतची सर्वात मोठी घुसखोरी असल्याचा ठपका संरक्षण मंत्रालयाने ठेवला.

तैवानच्या हद्दीतील प्रातास बेटांजवळ चिनी विमानांनी धडक मारल्यानंतर तैवानने रेडिओ संदेश पाठविला होता. तसेच आपली लढाऊ विमानेही रवाना केली होती. पण इशारे देऊनही चिनी विमाने माघार घेण्यास तयार नाहीत हे पाहून तैवानने आपली क्षेपणास्त्र यंत्रणा कार्यान्वित केली. त्याबरोबर चिनी विमाने साऊथ चायना सीच्या दिशेने वळली. याआधी २४ जानेवारी रोजी चीनने १२ विमाने तैवानच्या हद्दीत रवाना केली होती. त्यानंतर चीनच्या लढाऊ तसेच बॉम्बर विमानांनी तैवानच्या हवाईहद्दीचे उल्लंघन सुरू ठेवले आहे.

चीनच्या विमानांच्या या घुसखोरीच्या काही तास आधी तैवानने आपले नवे संरक्षण मंत्री म्हणून येन दे-फा यांची निवड करण्याचे संकेत दिले आहेत. दे-फा यांनी दोन दशकांपूर्वी अमेरिकन लष्कराच्या ‘वॉर कॉलेज’मधून प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

leave a reply