चीनच्या घुसखोर विमानांवर तैवान ‘फर्स्ट स्ट्राईक’ करील

- तैवानच्या संरक्षणमंत्र्यांचा इशारा

तैपेई – ‘‘याआधी तैवानच्या जमिनीवर तोफेचा किंवा क्षेपणास्त्रांचा हल्ला झालाच तर प्रत्युत्तरादाखल ‘फर्स्ट स्ट्राईक’ अर्थात पहिला हल्ला चढविण्याचे तैवानचे धोरण होते. पण चीनच्या लढाऊ विमानांच्या वाढत्या घुसखोरीमुळे फर्स्ट स्ट्राईकची व्याख्याच बदलली आहे. चीनच्या लष्करी विमानांनी आमच्या हवाईहद्दीत घुसखोरी केलीच तर तैवानकडे पहिला हल्ला चढविण्याचा अधिकार असेल’, असे तैवानचे संरक्षणमंत्री शिअू कुओ-शेंग यांनी बजावले. दरम्यान, चीनबरोबरच्या संघर्षाची शक्यता लक्षात घेऊन तैवान दर महिन्याला इंधन, अन्नधान्याचा साठा वाढवित असल्याची माहिती समोर आली आहे.

चीनच्या लढाऊ, बॉम्बर विमानांची तैवानच्या आखातातील घुसखोरी तीव्र होऊ लागली आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये चीनच्या विमानांनी तैवानची ‘मिडियन लाईन’ ओलांडली होती. तैवानच्या संसदेत चीनच्या या आक्रमक कारवाईचे पडसाद उमटले आहेत. तैवानच्या संसदेतील परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय संरक्षण समितीसमोर बोलताना संरक्षणमंत्री शिअू कुओ-शेंग यांनी चीनच्या घुसखोर विमानांविरोधात निश्चित धोरण असल्याचे स्पष्ट केले.

चीन आणि तैवानला विभागणाऱ्या ‘मिडियन लाईन’बाबत अव्यक्त करार अस्तित्वात होता. पण चीनच्या विमानांनी ही मिडियन लाईन ओलांडून या कराराचा भंग केला आहे. आत्ता तैवानच्या हद्दीजवळ युद्धसरावाचे आयोजन करून आणि विमानांच्या गस्ती वाढवून चीन ही स्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे संरक्षणमंत्री शिअू म्हणाले. पण चिनी विमानांच्या या घुसखोरीविरोधात तैवानच्या देखील ‘रेड लाईन’ असल्याचा इशारा शिअू यांनी दिला.

तैवानने आपल्या फर्स्ट स्ट्राईक धोरणात बदल केल्याचे सांगून संरक्षणमंत्री शिअू यांनी चीनला संदेश दिला. तोफांचा किंवा क्षेपणास्त्रांचा हल्ला झाल्यावरच तैवान हल्ला चढविल, अशा भ्रमात चीनने राहू नये. तर चीनच्या लष्करी विमानांनी तैवानची हवाई हद्द ओलांडली तर पहिला हल्ला चढविला जाईल, असे तैवानच्या संरक्षणमंत्र्यांनी बजावले. चीनच्या ड्रोन्सबाबतही हाच नियम लागू होतो, अशी माहिती शिअू यांनी तैवानच्या संसदेला दिली.

दरम्यान, येत्या काळात चीनचे नौदल तैवानच्या आखाताची कोंडी करून चीन तैवानवर हल्ला चढवू शकतो, असा इशारा काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाला होता. अमेरिकेचे नौदल तैवानची ही कोंडी फोडू शकतो, असा दावा अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडचे प्रमुख ॲडमिरल सॅम्युअल पापेरो यांनी केला आहे. पण चीनच्या आक्रमक डावपेचांची दखल घेऊन तैवानने दर महिन्याला इंधन, अन्नधान्याच्या साठ्यात वाढ सुरू केली आहे. चीनबरोबर संघर्ष पेटलाच तर त्याची पूर्वतयारी म्हणून ही काळजी घेत असल्याचे तैवानच्या उपअर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

leave a reply