चीनने तिआनानमेनमध्ये केलेली कारवाई तैवान कधीच विसरणार नाही

- राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन

तैपेई – ‘32 वर्षांपूर्वी तिआनानमेन स्क्वेअर परिसरातील लोकशाहीवादी निदर्शकांविरोधात चीनच्या राजवटीने केलेली कारवाई तैवानची जनता कधीच विसरणार नाही. तैवान लोकशाहीप्रती असलेली आपली निष्ठा कायम ठेवेल’, असे तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई ईंग-वेन यांनी बजावले. त्यापूर्वी तैवान सरकारने एक निवेदन प्रसिद्ध करून, चीनने जनतेच्या लोकशाहीवादी मागण्या चिरडणे थांबवावे व सत्ता जनतेच्या हाती द्यावी, असे आवाहन केले आहे.

चीनने तिआनानमेनमध्ये केलेली कारवाई तैवान कधीच विसरणार नाही - राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन4 जून, 1989 रोजी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने राजधानी बीजिंगच्या तिआनानमेन स्क्वेअर परिसरात आंदोलन करणार्‍या निदर्शकांविरोधात अमानुष कारवाई केली होती. यावेळी निदर्शकांवर गोळीबार करण्याबरोबरच रणगाडेही तैनात करण्यात आले होते. या कारवाईत शेकडो निदर्शकांचा बळी गेला होता. हजारो निदर्शकांना ताब्यात घेऊन तुरुंगात धाडण्यात आले होते. बळी व अटकेत असलेल्यांची खरी संख्या चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने कधीही उघड केली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. 2019 साली या घटनेला 30 वर्षे पूर्ण होत असताना चीनने या कारवाईचे समर्थन केले होते.

जगभरात अनेक देशांमध्ये दरवर्षी ‘तिआनानमेन स्क्वेअर’च्या स्मृतीप्रीत्यर्थ कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या पार्श्‍वभूमीवर तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यासंदर्भात केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. ‘स्वातंत्र्य व लोकशाहीचा अभिमान असणारी तैवानी जनता हा दिवस कधीच विसरणार नाही. कितीही आव्हाने आली तरी लोकशाहीप्रती तैवानी जनतेची निष्ठा कायम राहिल. तिआनानमेन स्क्वेअरमध्ये ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांनाही तैवान विसरणार नाही’, असे राष्ट्राध्यक्षा त्साई ईंग-वेन यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी हाँगकाँगमध्ये दरवर्षी तिआनानमेनची आठवण म्हणून आयोजित करण्यात येणार्‍या कार्यक्रमाचाही उल्लेख केला.चीनने तिआनानमेनमध्ये केलेली कारवाई तैवान कधीच विसरणार नाही - राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन

गेल्या वर्षभरात चीनकडून तैवानला सातत्याने आक्रमणाचा धमक्या देण्यात येत आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही चीनच्या लष्कराला युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. जगभरातील विश्‍लेषक तसेच तज्ज्ञही चीन तैवानवर हल्ल्याची योजना आखत असल्याचे इशारे देत आहेत. तैवानच्या नेत्यांनीही यासंदर्भात वारंवार आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले आहे. या पार्श्‍वभूमीवर तिआनानमेनचे निमित्त साधून तैवानी राष्ट्राध्यक्षांनी चीनला दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

दरम्यान, शुक्रवारी हाँगकाँगमधील काही गटांनी तिआनानमेनची आठवण म्हणून कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे समोर आले आहे. हाँगकाँगच्या व्हिक्टोरिया पार्क परिसरात शेकडो नागरिक एकत्र आल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले आहेत. यावेळी नागरिकांनी मेणबत्त्या तसेच मोबाईल्सच्या बॅटर्‍या चालू करून आदरांजली वाहिल्याचे सांगण्यात येते. या कार्यक्रमापूर्वी हाँगकाँगच्या पोलिसांनी आयोजक चौ हँग तुंगसह काहीजणांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यत येते.

चीनने गेल्या वर्षीपासून हाँगकाँगमध्ये तिआनानमेनसंदर्भातील कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी घातली आहे. तरीही यावर्षी शेकडो नागरिकांनी त्यात सहभागी होऊन चीनची बंदी धुडकावल्याचे स्पष्ट झाले आहे.

leave a reply