चीनबरोबरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर तैवानकडून स्वदेशी पाणबुडींची निर्मिती सुरू

स्वदेशी पाणबुडीतैपेई/बीजिंग – ‘आपल्या सार्वभौमत्त्वाच्या संरक्षणासाठी तैवानकडे प्रबळ इच्छाशक्ती आहे. स्वदेशी पाणबुड्यांची उभारणी हा त्यातीलच महत्त्वाचा टप्पा आहे. तैवानी नौदलाच्या युद्धक्षमता वाढविण्यासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरते. तैवानला वेढण्याचा प्रयत्न करणाऱ्या शत्रूच्या युद्धनौकांना रोखण्यात पाणबुड्या यशस्वी ठरतील’, अशा शब्दात तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी तैवानकडून उभारण्यात येणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या पाणबुड्यांचे महत्त्व अधोरेखित केले. तैवानकडून आठ पाणबुड्यांची उभारणी करण्यात येत असून यासाठी अमेरिका व दक्षिण कोरियाकडून सहाय्य करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.

मंगळवारी दक्षिण तैवानमधील काओसिउंग बंदरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात स्वदेशी बनावटीच्या पाणबुडीच्या निर्मितीला सुरुवात झाल्याची माहिती तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी दिली. यावेळी तैवानमधील अमेरिकेचे राजदूत ब्रेंट क्रिस्टन्सनही उपस्थित होते. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेने आपल्या कंपन्यांना तैवानच्या पाणबुडी निर्मिती कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे राजदूत ब्रेंट क्रिस्टन्सन यांची उपस्थिती महत्त्वाची मानली जाते.

स्वदेशी पाणबुडी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तैवानबरोबरील सहकार्याच्या मुद्यावर अधिक सक्रीय भूमिका घेतली आहे. अमेरिकेने तैवानमध्ये सुरू केलेले राजनैतिक कार्यालय, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी घेतलेली तैवानच्या नेत्यांची भेट, अमेरिकी नेत्यांचे तैवान दौरे आणि वाढते संरक्षण सहकार्य या गोष्टी ट्रम्प यांच्या भूमिकेचा भाग मानल्या जातात. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी, तब्बल तीन दशकांच्या कालावधीनंतर तैवानला लढाऊ विमानांचा पुरवठा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ तैवानला आधुनिक क्षेपणास्त्रे, टॉर्पेडो व प्रगत संरक्षण यंत्रणाही पुरविण्यात येत आहेत.

स्वदेशी पाणबुडीतैवानला शस्त्रास्त्रे पुरवित असतानाच या देशाने आपल्या संरक्षणक्षमता वाढविण्यासाठी अधिक तरतूद व प्रयत्न करावेत अशी भूमिकाही अमेरिकेकडून मांडण्यात आली आहे. त्याला अनुसरून तैवानने स्वदेशी बनावटीच्या संरक्षणयंत्रणा विकसित करण्यावरही भर दिला आहे. आतापर्यंत तैवानने स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान तसेच क्षेपणास्त्रे विकसित करण्यात यश मिळविले असून देशातील विविध तळांवर ती तैनातही करण्यात आली आहेत. स्वदेशी पाणबुड्यांची निर्मिती हा त्यातीलच पुढचा टप्पा मानला जातो. तैवानच्या ‘सीएसबीसी कॉर्पोरेशन’कडून पाणबुड्यांची निर्मिती करण्यात येणार असून 2025 साली पहिली पाणबुडी नौदलात दाखल होईल, असे सांगण्यात येते. दरम्यान, रविवारी अमेरिकेच्या वरिष्ठ नौदल अधिकाऱ्याने तैवानला दिलेल्या भेटीने चीन चांगलाच बिथरल्याचे समोर आले आहे.

अमेरिकेच्या ‘इंडो-पॅसिफिक कमांड’मध्ये ‘मिलिटरी इंटेलिजन्स’चे प्रमुख असणाऱ्या रिअर ॲडमिरल मायकल स्टडमॅन यांनी तैवानला भेट दिली होती. अमेरिका व तैवानमधील कोणत्याही स्वरुपातील संरक्षण सहकार्य चीन खपवून घेणार नाही, असा इशारा चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते झाओ लिजिअन यांनी दिला. तैवानबरोबरील अमेरिकेच्या वाढत्या सहकार्याला योग्य प्रत्युत्तर मिळेल, असेही लिजिअन यांनी बजावले. यापूर्वी आरोग्यमंत्री अलेक्स अझार तसेच परराष्ट्र विभागाचे वरिष्ठ अधिकारी केथ क्रॅक यांच्या तैवान दौऱ्यावरूनही चीनने अमेरिका तसेच तैवानला धमकावले होते.

leave a reply