तालिबानची वकिली करणाऱ्या पाकिस्तानला ताजिकिस्तानची चपराक`

दुशान्बे – ताजिकिस्तानने अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीला मान्यता द्यावी आणि तालिबानविरोधात लढणाऱ्या नॉर्दन अलायन्सला शस्त्र पुरेवू नये, अशा दोन मागण्या घेऊन पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ताजिकिस्तानचा दौरा केला. पण आंतरराष्ट्रीय कराराचे उल्लंघन करून अफगाणिस्तानचा ताबा घेणाऱ्या तालिबानला मान्यत देणार नसल्याचे सांगून ताजिकिस्तानने पाकिस्तानला चपराक लगावली. याचे पडसाद पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये उमटत आहेत.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी हे सध्या ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि इराण या अफगाणिस्तानच्या शेजारी देशांच्या दौऱ्यावर आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बुधवारी ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इमोमली रहमोन यांची दुशांबे येथे भेट घेतली. ताजिकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीला मान्यता द्यावी, अशी मागणी परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी केली. तालिबानच अफगाणिस्तानला योग्यरित्या हाताळू शकेल, असा विश्‍वास पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या भेटीत व्यक्त केला.

त्याचबरोबर ताजिकिस्तानने अफगाणिस्तानच्या पंजशीरमधील नॉर्दन अलायन्सला शस्त्रे पुरविण्याचे बंद करावे, असे आवाहन कुरेशी यांनी केले. ताजिकिस्तानकडून मिळणाऱ्या शस्त्रास्त्रांमुळे नॉर्दन अलायन्स तालिबानला आव्हान देत असल्याचा दावा पाकिस्तान करीत आहे. पण परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी तालिबानबाबत केलेल्या दोन्ही मागण्या ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष रहमोन यांनी माध्यमांसमोर जाहीररित्या फेटाळल्या.

‘अफगाणी जनतेवर अत्याचार करून सत्ता बळाकवलेल्या कुठल्याही गटाला ताजिकिस्तान अजिबात मान्यता देणार नाही. अफगाणी जनता आणि येथील अल्पसंख्यांकांची सुरक्षा व हित अबाधित राखणाऱ्यांनाच ताजिकिस्तानचा पाठिंबा असेल’, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष रहमोन यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना फटकारले. गेल्या काही दिवसांमध्ये तालिबानच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानातील ताजीक, हजारा, उझबेक या अल्पसंख्यांकांबरोबरच पश्‍तू नागरिकांवर केलेल्या अत्याचाराकडे ताजिकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर अफगाणिस्तानचे आगामी सरकार सर्वांना समावून घेणारे असेल तरच पुढील विचार केला जाईल, असे राष्ट्राध्यक्ष रहमोन म्हणाले.

ताजिकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी माध्यमांसमोर कुरेशी यांच्या तोंडावर तालिबानला मान्यता देणार नसल्याचे सांगितल्यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण पुन्हा एकदा अपयशी ठरल्याची टीका पाकिस्तानी माध्यमे करीत आहेत.

leave a reply