अधिकारांची मागणी करणाऱ्या अफगाणी महिलांवर तालिबानची कठोर कारवाई

काबुल – तालिबान स्थापन करीत असलेल्या सरकारमध्ये महिलांनाही स्थान द्या, अशी मागणी अफगाणिस्तानात जोर पकडू लागली आहे. निदर्शने करून ही मागणी करणाऱ्या अफगाणी महिला निदर्शकांवर शनिवारी काबुलमध्ये तालिबानने कठोर कारवाई केली. यात एक महिला निदर्शक जखमी झाल्यानंतर या निदर्शनांची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविली जाते. दरम्यान, महिलांच्या अधिकारांवरुन अमेरिकेने आम्हाला शिकवू नये, असे तालिबानने फटकारले आहे.

गेल्या महिन्यात तालिबानने अफगाणिस्तानच्या संसदेचा ताबा घेतला. त्याआधी या संसदेतील 250 सदस्यांमध्ये 68 महिला सदस्यांचा देखील समावेश होता. अफगाणिस्तानच्या सरकार तसेच सुरक्षा यंत्रणेतही महिलांचा समावेश होता. पण तालिबानने काबुलचा ताबा घेतल्यानंतर महिलांना मुलभूत अधिकार मिळतील की नाही, यावर शंका घेतली जात आहे.

आपल्या राजवटीत महिलांचे अधिकार अबाधित राहतील, असे आश्‍वासन तालिबानच्या नेत्यांनी दिले होते. पण तालिबानच्या सरकारमध्ये महिलांना स्थान मिळण्याची शक्यता नाही. याविरोधात गेल्या दोन दिवसांपासून राजधानी काबुलमध्ये राष्ट्राध्यक्षीय निवासस्थानासमोर अफगाणी महिला तालिबानविरोधात निदर्शने करीत आहेत. तालिबानच्या सरकारमध्ये आपल्यालाही स्थान मिळावे, अशी मागणी या महिला करीत आहेत.

शनिवारी या महिला निदर्शकांना पांगविण्यासाठी तालिबानच्या दहशतवाद्यांनी अश्रुधूराचा वापर केला. तर तालिबानने काही महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचेही उघड झाले आहे. नर्गिस सदात या कार्यकर्त्या तालिबानच्या कारवाईत जखमी झाल्या व त्यांच्या कपाळाला जबर मार लागला. महिला निदर्शकांना पांगविण्यासाठी तालिबानच्या दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार केल्याचे अफगाणी माध्यमांचे म्हणणे आहे.

दरम्यान, तालिबानने शिक्षण घेणाऱ्या मुली व महिलांसाठी नवा ‘ड्रेस कोड’ जाहीर केला आहे. यापुढे मुली व महिलांना पूर्ण अंग झाकलेले कपडे परिधान करून घराबाहेर पडावे लागेल, असे फर्मान तालिबानने सोडले आहे. अमेरिकेने तालिबानच्या या निर्णयावर आक्षेप घेत, मुली व महिलांना हिजाबशिवाय शिक्षण घेऊ द्या, अशी मागणी केली. याबाबत तालिबानवर जगभरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. तालिबानने महिलांचे अधिकार नाकारू नये, अशी सूचना अमेरिकेनेही केली होती. पण पाश्‍चिमात्यांची संस्कृती आम्हावर लादण्याचा प्रयत्न करू नका, असे तालिबानने अमेरिकेला बजावले आहे.

leave a reply