तालिबानकडून सात हजार सहकार्‍यांच्या सुटकेची मागणी

- मागणीमुळे अफगाणी नेत्यांची चिंता वाढली

काबुल – अफगाणिस्तानच्या सुमारे 85 टक्के भूभागावर ताबा घेणार्‍या तालिबानने आंतरराष्ट्रीय समुदाय आणि अफगाण सरकारसमोर आपल्या मागण्या ठेवल्या. अफगाणिस्तानात तीन महिन्यांची संघर्षबंदी हवी असेल तर आपल्या सात हजार सहकार्‍यांची सुटका करा, अशी मागणी तालिबानने केली. तालिबानची ही मागणी अफगाणिस्तानच्या सुरक्षेसाठी अधिक धोकादायक ठरेल, अशी भीती अफगाणी नेते व्यक्त करीत आहेत. दरम्यान, गेल्या चोवीस तासात तालिबानने उझबेकिस्तानच्या सीमेवरील चौकीचा ताबा घेतल्याच्या बातम्या येत आहेत.

तालिबानकडून सात हजार सहकार्‍यांच्या सुटकेची मागणी - मागणीमुळे अफगाणी नेत्यांची चिंता वाढलीअफगाणिस्तानच्या सरकारने तालिबानबरोबरच्या चर्चेसाठी नियुक्त केलेले प्रतिनिधी नादेर नादेरी यांनी दहशतवादी संघटनेने केलेल्या दोन मागण्यांची माहिती गुरुवारी उघड केली. गेल्या दोन महिन्यांपासून अफगाणिस्तानात सुरू असलेला संघर्ष रोखण्यासाठी तालिबान तयार आहे. तीन महिन्यांच्या संघर्षबंदीसाठी तालिबानने सात हजार साथीदार्‍यांच्या सुटकेची मागणी केली. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रसंघाने तालिबानच्या नेत्यांची नावे काळ्या यादीतून काढून टाकावी, अशी अट तालिबानने ठेवली आहे. पण या मागण्या म्हणजे तालिबानचा मोठा कट असल्याचा आरोप नादेरी यांनी केला.

तालिबानकडून सात हजार सहकार्‍यांच्या सुटकेची मागणी - मागणीमुळे अफगाणी नेत्यांची चिंता वाढलीयाआधी अफगाण सरकारने तालिबानच्या पाच हजार साथीदारांची सुटका केली होती. यातील बहुतांश जण तालिबानच्या दहशतवादी कारवायांमध्ये पुन्हा सामील झाल्याचा दावा केला जातो. तर या संघर्षबंदीचा वापर करून तालिबान नियंत्रणाखाली आलेल्या भागात आपले कायदे लादून पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करील, अशी भीती अफगाणी नेते व्यक्त करीत आहेत. त्यामुळे अफगाण सरकार आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने तालिबानची मागणी मान्य करू नये, असे नादेरी आणि अफगाणिस्तानचे इतर नेते सुचवित आहेत.

तालिबानकडून सात हजार सहकार्‍यांच्या सुटकेची मागणी - मागणीमुळे अफगाणी नेत्यांची चिंता वाढलीया सुमारास तालिबानने स्पिन बोल्दाक-चमन सीमा खुली करण्याची मागणी पाकिस्तानकडे केली आहे. काही तासांपूर्वी तालिबानने अफगाणी लष्कराला पिटाळून लावत स्पिन बोल्दाक चौकी व येथील शहराचा ताबा घेतला होता. यानंतर सुमारे 400 च्या जमावाने स्पिन बोल्दाक-चमन सीमेजवळ धडक देऊन पाकिस्तानात घुसण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानच्या लष्कराने चमन सीमा बंद केल्यानंतर या तालिबानसमर्थक जमावाने पाकिस्तानच्या सीमेत दगडफेक केली होती. यामुळे स्पिन बोल्दाक सीमेवर अश्रुधूराच वापर करावा लागल्याचे पाकिस्तानी लष्कराचे म्हणणे आहे.

सुमारे 1,500 जण चमन सीमा ओलांडून पाकिस्तानात दाखल होण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत आहेत. पाकिस्तानच्या लष्कराने आणि स्थानिक प्रशासनाने अफगाणींना पाकिस्तानात प्रवेश द्यावा, अशी मागणी तालिबानने केली आहे. यासाठी संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा सुरू असल्याचे तालिबानने म्हटले आहे.

leave a reply