तालिबानला काश्मीरशी देणेघेणे नाही, तो भारताचा अंतर्गत मुद्दा – तालिबानच्या प्रवक्त्याचा खुलासा

काबुल – तालिबानने भारताच्या विरोधात काश्मीरमध्ये जिहाद पुकारण्याची घोषणा केल्यानंतर पाकिस्तानातील भारतद्वेष्ट्या कट्टरपंथीयांना हर्षवायू झाला होता. आता पाकिस्तानी दहशतवादी भारतावर हल्ले घडविणार, असे सांगून पाकिस्तानातील भारतद्वेष्टे पत्रकार व गट त्यावर आनंद व्यक्त करू लागले होते. मात्र काही तासातच पाकिस्तानचे विमान जमिनीवर उतरले आहे. कारण तालिबानने काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगून दुसऱ्या देशाच्या अंतर्गत कारभारात आपण हस्तक्षेप करणार नाही, असा खुलासा केला आहे तसेच तालिबानने भारताच्या विरोधात जिहाद पुकारलाची बातमी ही फेक न्युज होती, असेही तालिबान म्हटले आहे.

कतारमधील तालिबानच्या कार्यालयाचा प्रमुख स्तानिकजाई याने भारताला धमकावल्याचा बातम्या पाकिस्तानी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. तर तालिबानचा प्रवक्ता झबिऊल्ला मुजाहिद याने आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून जम्मू-काश्मीरमधील भारतीय सैनिकांवर हल्ला चढवण्याची धमकी दिली होती. यावर पाकिस्तानच्या कट्टरपंथीय तसेच लष्कर समर्थक विश्लेषक आणि पत्रकारांनी ही बातमी उचलून धरली होती. आता भारताच्या विरोधात तालिबानच्या दहशतवादी हल्ल्याचे भयंकर सत्र सुरू होईल, असे दावे हे सारे जण करू लागले होते.

यातल्या काही जणांनी तर पाकिस्तानने या आघाडीवर तालिबानला सर्वतोपरी सहाय्य करावे, असा सल्लाही दिला होता. मात्र याला काही तास उलटत नाही तोच तालिबानच्या या प्रवक्त्याने आपल्या नावाने कोणीतरी फेक न्युज पसरविण्याचा दावा करून तालिबान भारताच्या विरोधात नसल्याचे स्पष्टीकरण दिले. स्तानिकजाई याने देखील आपण भारताच्या विरोधात जिहाद पुकारण्याची धमकी दिलीच नव्हती, असे जाहीर केले.

‘तालिबानची आपल्या शेजारी देशांबाबतची भूमिका अतिशय स्पष्ट असून या देशांच्या कुठल्याही अंतर्गत मुद्यात तालिबान हस्तक्षेप करणार नाही. काश्मिर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून, काश्मिरमध्ये सुरू असलेल्या पाकिस्तान पुरस्कृत संघार्षात तालिबान सहभागी होणार नाही’, असे अफगाणिस्तानातील तालिबानचा राजकीय गट ‘इस्लामिक एमिरेट्स इन अफगानिस्तान’चा प्रवक्ता सुहेल शाहीन याने स्पष्ट केले. अशाप्रकारे भारताच्या विरोधात प्रचार करणारे पाकिस्तानचे फेक मीडियाचे जाळे तालिबानच्या प्रवक्त्याने उघड केले.

तालिबानचा खुलासा आल्यानंतर तोंडघशी पडलेल्या पाकिस्तानी माध्यमांनी आपला बचाव करण्यासाठी तालिबानने दिलेल्या धमकीचेही खापर भारतावर फोडले. अमेरिका आणि तालिबानमध्ये शांतीकरार झाल्यापासूनच भारत हा शांतीकरार मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे, असा दावा पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांवर काही पत्रकारांनी केला. इतकेच नाही तर भारताने आपल्याला तालिबान धमकी देत असल्याची फेक न्युज पसरविली, असा जावईशोध या पत्रकारांनी लावला. याद्वारे भारत तालिबान आणि पाकिस्तानला बदनाम करू पाहत असल्याचे या पत्रकाराचे म्हणणे आहे.

दहशतवाद्यांना आर्थिक सहाय्य केल्याप्रकरणी पाकिस्तानवर ‘एफडीए’च्या कारवाईची कुऱ्हाड लटकत आहे. अशा परिस्थितीत, तालिबानकडून भारताला मिळालेल्या धमकीचे बातमी भारताच्या पथ्यावर पडणारी असून यामुळे पाकिस्तान अधिक अडचणीत येईल, असा या पत्रकारांचा दावा आहे. म्हणूनच ज्यांनी तालिबानने भारताला दिलेल्या धमकीची बातमी उचलून धरून त्यावर आनंद व्यक्त केला, ते सारे पाकिस्तानी विश्लेषक पत्रकार अजाणतेपणे भारताला सहाय्य करीत आहेत व पाकिस्तानला धोक्यात टाकत आहेत, अशी चिंता पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांवरील काही पत्रकारांनी व्यक्त केली आहे.

leave a reply