तालिबानने सर्वसमावेशक सरकारबाबत दिलेली वचने पाळलेली नाहीत

- युरोपिय महासंघाचा ठपका

ब्रुसेल्स/वॉशिंग्टन – अफगाणिस्तानमधील तालिबानच्या राजवटीने सर्वसमावेशक सरकारच्या स्थापनेबाबत दिलेली वचने पाळलेली नाहीत, असा ठपका युरोपिय महासंघाने ठेवला आहे. तर चीनने तालिबानच्या सरकारस्थापनेनंतर अराजक संपुष्टात आल्याची प्रतिक्रिया देऊन स्वागत केले आहे. अमेरिकेने सध्या तरी तालिबानला मान्यता देण्याबाबत नकार दिला आहे. तालिबानने स्थापन केलेल्या अंतरिम सरकारमध्ये कुख्यात दहशतवाद्यांचा समावेश असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता अवघड असल्याचे संकेत मिळाले आहेत.

मंगळवारी तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन केल्याची घोषणा केली होती. यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी सिराजुद्दिन हक्कानीसह मुल्ला हसन अखुंद, मुल्ला बरादर व मुल्ला याकुब यांचा समावेश आहे. मात्र यापूर्वी तालिबानने सांगितल्याप्रमाणे अफगाणिस्तानमधील सर्व गट, अल्पसंख्यांक व महिलांना सरकारमध्ये स्थान नाही. याची गंभीर दखल पाश्‍चात्य देशांनी घेतल्याचे युरोपिय महासंघाच्या प्रतिक्रियेवरून दिसून येते.

‘तालिबानने जाहीर केलेल्या नावांच्या विश्‍लेषणानंतर हे सरकार सर्वसमावेशक असल्याचे दिसत नाही. अफगाणिस्तानच्या धार्मिक तसेच वांशिक वैविध्याचे प्रतिनिधित्त्व यात नाही. तालिबानने गेल्या काही आठवड्यांमध्ये जे वचन दिले होते व त्याप्रमाणे जी आशा दिसत होती त्याची पूर्तता झाल्याचे दिसत नाही’, असा ठपका युरोपिय महासंघाने ठेवला आहे. महासंघाने तालिबानशी संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेत पाच अटी नमूद केल्या होत्या. त्यात सर्वसमावेशक सरकार ही प्रमुख अट होती, असे महासंघाच्या प्रवक्त्यांनी नमूद केले.

अमेरिकेने तालिबानला मान्यता देण्याची शक्यता अद्याप दूर असल्याचे म्हंटले होते. तर महासंघाने दिलेली प्रतिक्रिया युरोपिय देशही तालिबान सरकारला मान्यता देण्याची घाई करणार नसल्याचे संकेत देणारी ठरली आहे. दुसर्‍या बाजूला चीनने मात्र तालिबानच्या सरकारस्थापनेचे स्वागत केले आहे. तालिबानने सरकारस्थापनेची घोषणा केल्याने अराजकाचा काळ संपल्याची प्रतिक्रिया चीनने दिली. अफगाणिस्तानची पुनर्बांधणी आणि कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे चीनच्या प्रवक्त्यांनी म्हंटले आहे. तालिबानची घोषणा चीनच्या दृष्टिने महत्त्वाची आहे, असेही चीनकडून सांगण्यात आले.

चीनने स्वागत केले असले तरी चीन व तालिबानच्या संबंधांमध्ये अडचणी येऊ शकतात, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हंटले आहे. त्याचवेळी चीन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल, असा दावाही त्यांनी केला. चीनबरोबरच पाकिस्तान, रशिया व इराणही तालिबानच्या बाबतीत तडजोड करण्याचा प्रयत्न करतील, असे संकेत बायडेन यांनी दिले आहेत. दरम्यान, बुधवारी अमेरिका व जर्मनीच्या पुढाकाराने तालिबान राजवटीच्या मुद्यावर प्रमुख देशांची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

leave a reply