अफगाणिस्तानच्या कंदहारमध्ये तालिबानकडून 33 जणांची हत्या

- 22 हजाराहून अधिक अफगाणींचे पलायन

काबुल – अफगाणिस्तानच्या कंदहार प्रांतात 33 जणांची निघृण हत्या घडवून तालिबानने पुन्हा एकदा क्रौर्याचे अमानुष प्रदर्शन केले. या भयंकर हत्याकांडाने कंदहारसह अफगाणिस्तान हादरले आहे. यामुळे कंदहारमधील 22 हजारांहून अधिकजणांनी जीव वाचवण्यासाठी दुसर्‍या प्रांतात धाव घेतल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, तालिबानची आगेकूच रोखण्यासाठी अफगाणिस्तानच्या 34 पैकी 31 प्रांतांमध्ये संचारबंदी लागू केली.

अफगाणिस्तानच्या कंदहारमध्ये तालिबानकडून 33 जणांची हत्या - 22 हजाराहून अधिक अफगाणींचे पलायनआत्ताची तालिबान 90च्या दशकाप्रमाणे कट्टरवादी नसेल, असा संदेश तालिबानकडून दिला जात होता. तालिबानची प्रतिमा उजळविण्यासाठी पाकिस्तान प्रचंड प्रमाणात प्रयत्न करीत आहे. मात्र कंदहारमधील हत्याकांडाने तालिबानचा क्रूर, अमानवी चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला. अफगाणिस्तानातील मानवाधिकार संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन आठवड्यांमध्ये कंदहारच्या दक्षिणेकडील भागात हे हत्याकांड झाले.

धार्मिक नेते, स्थानिक टोळ्यांचे प्रमुख, नागरी व्यवस्थेतील कर्मचारी, महिला पत्रकार आणि मानवाधिकार संघटनांच्या समर्थकांना तालिबानने लक्ष्य केले. युद्धाच्या काळातही सामान्य नागरिकांची हत्या करणे हा युद्धगुन्हा ठरतो, अशी टीका अफगाणी मानवाधिकार संघटनेने केली. अफगाणी सरकार आणि दहशतवादी संघटनांनी या संघर्षात सर्वसामान्य नागरिकांचा जीव घेऊ नये, असे आवाहन मानवाधिकार संघटनांनी केले आहे.अफगाणिस्तानच्या कंदहारमध्ये तालिबानकडून 33 जणांची हत्या - 22 हजाराहून अधिक अफगाणींचे पलायन

मात्र लक्षवेधी बाब म्हणजे अफगाणी मानवाधिकार संघटनेने या निघृण हत्याकांडासाठी तालिबानला दोषी धरलेले नाही. मात्र ज्या भागात हे हत्याकांड झाले त्या कंदहार प्रांतात तालिबानचे वर्चस्व आहे. गेल्या दोन आठवड्यांमध्ये तालिबानने येथील स्पिन बोल्दाकसह महत्त्वाच्या भागात ताबा मिळवून शंभराहून अधिक जणांना ठार केल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. त्याचबरोबर, तालिबानने अफगाण सरकार व लष्कराला सहाय्य करणार्‍यांचा शोध सुरू केल्याचे दावे अफगाणी मानवाधिकार संघटनेने केले आहेत.

अफगाणिस्तानच्या कंदहारमध्ये तालिबानकडून 33 जणांची हत्या - 22 हजाराहून अधिक अफगाणींचे पलायनकंदहार शहराच्या आसपासच्या भागातून तालिबानने किमान 300हून अधिक जणांना ताब्यात घेऊन अज्ञात ठिकाणी लपविल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे या 33 जणांच्या हत्याकांडामागे तालिबान असण्याची दाट शक्यता वर्तविली जाते. दोन दशकांपूर्वी कंदहार हे तालिबानचे प्रमुख सत्ताकेंद्र होते. गेल्या काही आठवड्यांमध्ये तालिबानने कंदहारमधील बहुतांश जिल्ह्यांचा ताबा घेतल्यानंतर भयभीत झालेल्या 22 हजारांहून अधिक अफगाणी नागरिकांनी येथून पळ काढल्याची चिंता मानवाधिकार संघटनेने व्यक्त केली.

दरम्यान, तालिबानच्या दहशतवाद्यांची आगेकूच रोखण्यासाठी अफगाण सरकारने 31 प्रांतात संचारबंदी जाहीर केली. काबुल, पंजशीर आणि नांगरहार हे तीन प्रांत वगळून देशभरात ही संचारबंदी असेल, असे अफगाणिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने स्पष्ट केले. राजधानी काबुलच्या सुरक्षेसाठी अफगाण सरकारने संचारबंदीचा हा निर्णय घेतल्याचा दावा अफगाणी नेते करीत आहेत.

leave a reply