इस्रायलशी सहकार्य करण्यास तालिबानची हरकत नाही

- तालिबानच्या प्रवक्त्याचे धक्कादायक विधान

काबुल – ‘चर्चा आणि सामंजस्याने प्रत्येकाबरोबरचे प्रश्न सोडविणे, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे ज्या कुणालाही आमच्याशी समस्या असतील आणि त्या सोडवायच्या असतील, तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. अगदी इस्रायलबरोबरही चर्चा करायला आम्ही तयार आहोत’, असा धक्कादायक दावा तालिबानचा प्रवक्ता मुहम्मद नईम याने कतारी वृत्तवाहिनशी बोलताना केला. यामुळे युएई, बाहरिन यांच्यापाठोपाठ तालिबानची राजवट असलेला अफगाणिस्तान देखील इस्रायलबरोबर अब्राहम करार करून राजनैतिक सहकार्य प्रस्थापित करणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

वर्षभरापूर्वी तालिबानने अफगाणिस्तानात आपली राजवट प्रस्थापित केली. यानंतर तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहिन याने आंतरराष्ट्रीय माध्यमांना दिलेल्या वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये इस्रायल वगळता जगभरातील बहुतांश देशांबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी तालिबान तयार असल्याचे म्हटले होते. पॅलेस्टाईनचा मुद्दा अधोरेखित करुन तालिबानच्या प्रवक्त्याने इस्रायलशी संबंध प्रस्थापित होऊ शकत नसल्याचे जाहीर केले होते. या दरम्यान तालिबानच्या बड्या नेत्यांनी हमासच्या दहशतवाद्यांची भेट घेतल्याचे फोटोग्राफ्स देखील समोर आले होते.

महिन्याभरापूर्वी इस्रायलने गाझापट्टीतील दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या कारवाईवरही तालिबानने टीका केली होती. पण कतारच्या ‘अल जझिरा’ या वृत्तवाहिनीने काही दिवसांपूर्वी तालिबानच्या राजकीय विभागाचा प्रवक्ता मुहम्मद नईमने दिलेल्या मुलाखतीने खळबळ उडविली आहे. यामध्ये तालिबानचा प्रवक्ता आपल्या संघटनेची भूमिका स्पष्टपणे मांडताना दिसत आहे. याआधी तालिबानशी शत्रूत्व असणारे देश किंवा व्यक्तीबरोबर चर्चा करून प्रश्न सोडविण्यासाठी देखील आपली संघटना तयार असल्याचे तालिबानचा प्रवक्ता नईम याने मुलाखतीत म्हटले आहे.

‘तालिबान इस्रायलशी देखील चर्चा आणि सहकार्य करील का? असा प्रश्न मुलाखतकाराने नईम याला केला. त्यावर ‘इस्रायलबरोबर चर्चा करायला काय समस्या आहे. हे सारे प्रश्न माध्यमांनी तयार केले आहेत. जर एखादा देश किंवा व्यक्तीला आमच्याशी समस्या नसतील, तर त्या देशाबरोबर चर्चा करायला हरकतच काय आहे. तुम्हाला त्यात काय अडचण आहे. तुमचा हा प्रश्नच अप्रस्तुत ठरतो’, अशा शब्दात नईम याने मुलाखतकाराला सुनावले.

तालिबानच्या प्रवक्त्याने इस्रायलबाबत केलेल्या या विधानाला पाकिस्तान आणि इस्रायली माध्यमांमध्ये मोठी प्रसिद्ध मिळाली. या मुलाखतीद्वारे तालिबान इस्रायलला संदेश देत असल्याचे दावे काहीजणांनी केले आहेत. युएई, बाहरिन या अरब देशांच्या पाठोपाठ तालिबानची राजवट असलेला अफगाणिस्तान देखील इस्रायलबरोबर अब्राहम करार करण्याच्या तयारीत तर नाहीना, असा प्रश्न इस्रायली माध्यमे विचारीत आहेत. तर मुहम्मद नईमच्या या मुलाखतीमुळे तालिबानमध्येच दोन गट पडल्याचे समोर आले आहे. तालिबानमधील एका गटाने नईमच्या विधानांपासून फारकत घेतल्याच्या बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या आहेत.

leave a reply