काबुल – ‘तालिबानमध्ये कुठलीही फूट पडलेली नाही. मी अगदी ठणठणीत आहे’, असे सांगणारा मुल्ला बरादर याचा व्हिडिओ तालिबानने प्रसिद्ध केला. तालिबानच्या बरादर आणि हक्कानी गटात संघर्ष पेटल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. यामुळे बरादर याने काबुल सोडून कंदहारमध्ये तळ ठोकल्याचे बोलले जात होते. यावर तालिबानने बरादर याचा व्हिडिओ प्रसिद्ध करून आपली एकजूट दाखविण्याचा प्रयत्न केला. पण शस्त्रसज्ज दहशतवाद्यांच्या उपस्थितीत बरादर त्याच्याकडे सोपविलेले निवेदन वाचून दाखवित असल्याचे या व्हिडिओतून समोर आले आहे. यामुळे हक्कानी गटाने बरादरला नजरकैद केल्याचा संशय बळावला आहे.
गेल्या आठवड्यात काबुलच्या राष्ट्राध्यक्षीय निवासस्थानात सत्तावाटपातील मतभेदानंतर बरादर आणि हक्कानी गटाच्या समर्थकांमध्ये संघर्ष पेटला होता. यानंतर बरादर याने आपल्या समर्थकांसह कंदहारमध्ये दाखल झाला होता. तालिबानच्याच वरिष्ठ कमांडरने आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला ही माहिती दिली होती. बरादरने काबुलचा बहिष्कार केल्याचे या तालिबानी कमांडरने सांगितले. यामुळे तालिबानमध्ये फूट पडल्याच्या बातम्या जगभरात प्रसिद्ध झाल्या.
याचे खंडन करण्यासाठी तालिबानने बरादरचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. यामध्ये बरादरच्या शेजारी रायफलधारी दहशतवादी दिसत आहेत. तसेच बरादर तालिबानमध्ये फूट पडल्याच्या बातम्या, हातात असलेले निवेदन वाचून नाकारत असल्याचा या व्हिडिओतून समोर आले आहे.
आपली खुशाली आणि तालिबानमधील एकी कायम असल्यासाठी बरादरला मजकूर वाचून दाखवावा लागतो, यावर माध्यमे व विश्लेषक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. त्याचबरोबर शस्त्रधारी दहशतवाद्याच्या उपस्थितीत बरादर याने निवेदन वाचून दाखविल्यामुळे बरादर याला नजरकैद केल्याची शक्यता वर्तविली जाते.
बरादरच्या या व्हिडिओनंतर हक्कानी नेटवर्कचा नेता अनस हक्कानी याने सोशल मीडियावरुन आपला व्हिडिओ प्रसिद्ध केला. यात अनस देखील लिखित मजकूर वाचताना दिसत आहे. पण त्याच्या शेजारी शस्त्रसज्ज तालिबानी नाहीत, याकडे विश्लेषक लक्ष वेधत आहेत. यावरुन बरादरला नजरकैदेत असल्याचा संशय बळावला आहे.
दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेषदूत डेबोरा लियॉन्स यांनी तालिबानच्या हक्कानी गटाचा नेता सिराजुद्दीन हक्कानी याची भेट घेतली. यावर आश्चर्य व्यक्त केले जाते. कारण सिराजुद्दीन हा अमेरिकन एफबीआयच्या मोस्ट वॉंटेड लिस्टमध्ये तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या काळ्या यादीत आहे. त्यामुळे लियॉन्स व सिराजुद्दीनच्या यांची भेट नजरेत भरणारी ठरते. अद्याप कुठल्याही देशाने तालिबानच्या सरकारला मान्यता दिलेली नाही. अशा परिस्थितीत लियॉन्स व सिराजुद्दीन यांच्या या भेटीवर काहीजणांनी जोरदार आक्षेप नोंदविला आहे.