भारत व तालिबानमधील चर्चा अत्यावश्यक ठरते

- रशियाच्या अफगाणिस्तानविषयक दूतांचा दावा

मॉस्को – रशियाने आयोजित केलेल्या अफगाणिस्तानविषयक परिषदेत तालिबानने सहभाग घेतला होता. या परिषदेतील भारताची उपस्थिती ही लक्षणीय बाब ठरली. भारत व तालिबानमध्ये यावेळी झालेली चर्चा ही स्वागतार्ह बाब ठरते, असे रशियाने म्हटले आहे. रशियाने अफगाणिस्तानसाठी नेमलेले विशेषदूत झमीर काबुलोव्ह यांनी ही प्रतिक्रिया नोंदविली. अद्याप भारताने तालिबानबरोबरील चर्चेबाबत अधिकृत पातळीवर कुठल्याही स्वरुपाची प्रतिक्रिया दिलेली नाही.

भारत व तालिबानमधील चर्चा अत्यावश्यक ठरते - रशियाच्या अफगाणिस्तानविषयक दूतांचा दावापुढच्या महिन्यात भारतानेही अफगाणिस्तानविषयक परिषदेचे आयोजन केले आहे. यामध्ये अमेरिका, रशिया तसेच या क्षेत्रातील संबंधित देशांबरोबरच पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी भारत तालिबानशी स्वतंत्र चर्चा करणार का, असे प्रश्‍न विचारले जात आहेत. त्याच्या आधी रशियामधील अफगाणिस्तानविषयक चर्चेत भारताची तालिबानबरोबरील ही चर्चा लक्षणीय ठरते. भारताने याआधीच आपण अफगाणिस्तानच्या जनतेसोबत असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र तालिबानने दहशतवादाचा पुरस्कार करण्याचे थांबवून अल्पसंख्यांक व महिलांना अधिकार बहाल केल्याखेरीज तालिबानला मान्यता देण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे भारताने बजावले आहे.

जगभरातील इतर प्रमुख देश देखील तालिबानकडून अशाच स्वरुपाची अपेक्षा व्यक्त करीत आहेत. सध्या अनेक महत्त्वाच्या प्रश्‍नांवर तालिबानमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. तालिबानवर नियंत्रण प्रस्थपित करण्यात यशस्वी ठरलेल्या हक्कानी नेटवर्कच्या कट्टरवादी धोरणाविरोधात तालिबानच्या इतर गटांमध्येही नाराजी व असंतोष वाढत चालला आहे. याची परिणिती नव्या संघर्षात होईल, असे दावे केले जातात. तसेच यामुळे तालिबानवरील पाकिस्तानचे नियंत्रण सुटणार असल्याचेही स्पष्टपणे दिसू लागले आहे. अशा परिस्थितीत तालिबानमधला एक गट भारत व इतर देशांचे सहाय्य घेऊन अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करू शकतो.

अशा परिस्थितीत तालिबानबाबत आधीची भूमिका कायम ठेवणे भारतासाठी अवघड जाऊ शकते. भारताने काही अंशी तालिबानबाबतची आपली भूमिका सौम्य केलेली आहे, ही स्वागतार्ह बाब ठरते, असे रशियन विशेषदूत काबुलोव्ह यांनी म्हटले असून पुढच्या काळातही अशा भेटीगाठी व चर्चा अत्यावश्यक असल्याचा दावा केला. विशेषतः अफगाणी जनतेला सहाय्य पुरविण्यासाठी तालिबानशी चर्चा करणे भाग आहे, हे लक्षात घ्यावेच लागेल, असे काबुलोव्ह पुढे म्हणाले. सध्या तरी भारताचे तालिबानबरोबरील चर्चा याच मुद्यापुरती मर्यादित राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पण जर पुढच्या काळात तालिबानने भारताच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पावले उचलली तर भारताकडूनही त्याला प्रतिसाद मिळू शकतो, असे संकेत रशियात पार पडलेल्या अफगाणिस्तानविषयक चर्चेतून मिळाले आहेत.

leave a reply