दमास्कस – ‘आयएस’ ही दहशतवादी संघटना सिरियात पुन्हा आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समोर येत आहे. शुक्रवारी ‘आयएस’ने पूर्व सिरियातील देर एझोरमध्ये चढविलेल्या दहशतवादी हल्ल्यात इंधनकंपनीच्या दहा कर्मचाऱ्यांचा बळी गेला असून काही जण जखमी झाले आहेत. या आठवड्यात ‘आयएस’ने केलेला हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला ठरतो. सोमवारी ‘आयएस’ने सिरियाच्या रक्का शहरात केलेल्या हल्ल्यात सहा कुर्दिश बंडखोरांचा बळी गेला होता.
शुक्रवारी देर एझोरमधील अल तईम इंधनक्षेत्रात काम करणारे कर्मचारी बसमधून प्रवास करीत होते. त्यावेळी आयएसच्या दहशतवाद्यांनी तीन बसेसना लक्ष्य केले. एका बससमोर आत्मघाती स्फोट घडविण्यात आला व त्यानंतर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. या गोळीबारात 10 जणांचा बळी गेला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर आयएसचे दहसतवादी निसटण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात येते.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेने केलेल्या एका कारवाईत ‘आयएस’चा प्रमुख अबु इब्राहिम अल हाशिमी ठार झाला होता. त्यानंतर अबु हसन अल हाशिमी नवा प्रमुख म्हणून नियुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. ऑक्टोबर महिन्यात ‘फ्री सिरियन आर्मी’ने केलेल्या हल्ल्यात अबु हसन ठार झाल्याचे समोर आले होते. अबु हसनच्या मृत्यूनंतर अबु हुसेन अल हुसेनीची आयएसचे नवे प्रमुख म्हणून घोषणा करण्यात आली होती. अबु हुसेन यांनी ‘आयएस’चा प्रभाव वाढविण्यासाठी नव्याने हल्ले सुरू केले असून एकाच आठवड्यात झालेले दोन हल्ले त्याचाच भाग ठरतो.
सोमवारी कुर्दवंशियाचे प्राबल्य असलेल्या रक्का शहरातील सिक्युरिटी कॉम्प्लेक्सवर दहशतवादी हल्ला चढविण्यात आला होता. या हल्ल्यानंतर कुर्दवंशियांच्या ‘सिरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस’ने रक्कासह जवळच्या भागांमध्ये आणीबाणीची घोषणा केली होती. त्याचवेळी या भागात व्यापक दहशतवादविरोधी मोहिमही हाती घेण्यात आली. वर्षअखेरीस आयएसकडून मोठ्या हल्ल्यांचा कट आखण्यात आल्याचा दावा करून ही मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत गेल्या काही दिवसात ‘आयएस’च्या तब्बल 52 दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्याची माहिती ‘सिरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस’ने दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच तुर्कीने सियिित मोठी लष्करी कारवाई करून कुर्दिश बंडखोर गटांना लक्ष्य केले होते. त्यानंतर अमेरिकेने सिरियात नव्या लष्करी तैनातीची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर रशियाने सिरिया व तुर्कीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून अमेरिकेला इशारा दिला होता.