रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियन नौदलात दोन आण्विक पाणबुड्यांसह चार युद्धनौकांचा समावेश

आण्विक पाणबुड्यामॉस्को – रशिया-युक्रेनमधील युद्धाची तीव्रता वाढत असतानाच गुरुवारी रशियन नौदलात चार नव्या युद्धनौकांचा समावेश झाला आहे. यात दोन आण्विक पाणबुड्यांसह एक विनाशिका व एका ‘माईनस्वीपर’चा समावेश आहे. पुढील काळात रशिया युद्धनौका व पाणबुड्यांच्या निर्मितीचा वेग अधिक वाढवेल असे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी यावेळी बजावले.

रशिया-युक्रेन युद्धाच्या सुरुवातीच्या काळात युक्रेनने रशियन नौदलाचा भाग असलेली ‘मोस्कव्हा’ ही आघाडीची युद्धनौका बुडविल्याचा दावा केला होता. ही घटना रशियन नौदल व संरक्षणदलांच्या मनोधैर्याला धक्का देणारी ठरल्याचे दावे युक्रेनसह पाश्चिमात्य माध्यमांनी केले होते. मोस्कव्हा बुडाल्यानंतर रशियन नौदलाने युक्रेनमधील संघर्षातील सहभाग कमी केल्याचे तसेच काही युद्धनौकांना दुसऱ्या भागात पाठविण्यात आल्याचे दावेही करण्यात आले होते. मोस्कव्हाच्या घटनेनंतर युक्रेनने क्रिमिआतील तळांवर तैनात युद्धनौकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या.

आण्विक पाणबुड्या

या पार्श्वभूमीवर चार नव्या युद्धनौकांचा रशियन नौदलातील समावेश लक्ष वेधून घेणारा ठरतो. यात ‘जनरलिसोमो सुवोरोव्ह’ व ‘एम्परर अलेक्झांडर थ्री’ या दोन आण्विक पाणबुड्यांचा समावेश आहे. ‘जनरलिसोमो सुवोरोव्ह’ नौदलात कार्यरत झाली असून ‘एम्परर अलेक्झांडर थ्री’च्या काही चाचण्या बाकी असल्याचे सांगण्यात येते. या दोन्ही पाणबुड्यांवर प्रत्येकी 16 ‘बुलावा’ अण्वस्त्रे तैनात करण्याची क्षमता आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये रशियाने युक्रेनवरील क्षेपणास्त्रहल्ल्यांसाठी युद्धनौका व पाणबुड्यांचा वापर केला होता. त्यामुळे दोन नव्या पाणबुड्यांचा समावेश महत्त्वाचा ठरतो. येत्या काही वर्षात अजून चार प्रगत आण्विक पाणबुड्या रशियन नौदलात सामील होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आण्विक पाणबुड्यांव्यतिरिक्त ‘ग्रॅड’ ही विनाशिका (कॉर्व्हेट) व ‘ॲनातोली श्लेमोव्ह’ ही माईनस्वीपर शिपही नौदलात सामील झाली. राष्ट्राध्यक्ष पुतिन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी रशिया-युक्रेन मोहिमेतून मिळालेल्या अनुभवाच्या आधारावर रशियन नौदलात बदल घडविले जातील, असे संकेत दिले.

leave a reply