लडाखच्या एलएसीवरील तणाव इतक्यात कमी होण्याची शक्यता नाही

नवी दिल्ली/बीजिंग – लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी चीन भारताशी वाटाघाटी करीत आहे. दोन्ही देशा यासाठी राजनैतिक आणि लष्करी पातळ्यांवर चर्चा करीत आहेत, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. पण प्रत्यक्षात चीन लडाखच्या ‘एलएसी’वरून माघार घेण्यास तयार नाही. त्यामुळे दोन्ही देशांमधला तणाव इतक्यात कमी होण्याची शक्यता नसल्याचा निर्वाळा भारताचे लष्करी अधिकारी देत आहेत, असे माध्यमांचे म्हणणे आहे.

तणाव

‘भारत आणि चीन एलएसीवरील तणाव कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत व यासाठी राजनैतिक तसेच लष्करी पातळीवर दोन्ही देशांची चर्चा सुरू आहे’, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी म्हटले आहे. लडाखच्या एलएसी व त्यानजिकच्या क्षेत्रात चीनने सुमारे 50 हजार जवान तैनात केले आहेत. भारतानेही तोडीस तोड तैनाती करून चीनला प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे या क्षेत्रात युद्धाचा भडका उडू शकतो, अशी चिंता व्यक्त केली जाते. हा तणाव कमी करण्यासाठी उभय देशांमध्ये चर्चेच्या आठ फेऱ्या झाल्या आहेत. यापैकी आठवी फेरी 6 नोव्हेंबर रोजी पार पडली होती.

या चर्चेतून फारसे काही निष्पन्न झालेले नाही. काही आठवड्यांपूर्वी चीनने भारताच्या मागणीनुसार आपले जवान लडाखच्या पँगाँग सरोवराच्या क्षेत्रातील ‘फिंगर 4’ वरून ‘फिंगर 8’पर्यंत मागे घेण्याची तयारी दाखविली होती. पण आता मात्र चीन तसे करण्यास तयार नाही. कारण चीनच्या नेतृत्त्वाला ही बाब मान्य नसल्याचा दावा, भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी केला आहेे. उलट भारतानेच पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील मोक्याच्या टेकड्यांचा ताबा सोडावा, असा हटवादी आग्रह चीनने धरला आहे. मात्र इथून माघार घ्यायचीच असेल तर ती दोन्ही देशांच्या सैनिकांनी घ्यायला हवी, असे भारताने चीनला सुनावले आहे.

चीन भारताची ही मागणी मान्य करणार नसेल, तर भारत दिर्घकाळासाठी या क्षेत्रात आपले सैन्य तैनात ठेवण्यास तयार आहे. चीनला याची जाणीव करून दिली जात आहे. सध्या लडाखच्या क्षेत्रात चीनचे जवान गारठले असून या ठिकाणी दररोज नव्याने जवान तैनात करावे लागत आहेत. इतकेच नाही तर चीनच्या जवानांचे मनोधैर्य खचले असून ते वारंवार आजारी पडत आहेत. चीनने कुठलीही तयारी न करता भारताला या क्षेत्रात छेडण्याची घोडचूक केली. त्यावर भारताकडून येणाऱ्या प्रतिक्रियेचा अत्यंत चुकीचा अंदाज चीनने बांधला आणि त्याचे परिणाम आज चीन सहन करीत असल्याचे पाश्‍चिमात्य विश्‍लेषक सांगत आहेत.

दरम्यान, भारताच्या राजकीय नेतृत्त्वाने पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील मोक्याच्या टेकड्या ताब्यात घेण्याचे आदेश लष्कराला मे महिन्यातच दिले होते, अशी माहिती उघड झाली आहे. लडाखच्या ‘एलएसी’जवळून चीनने माघार घ्यावी, असे वारंवार बजावून देखील चीनने त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर ‘मुखपरी’, ‘रेझांग ला’, ‘रेचिन ला’, ‘गुरुंग’ तसेच या क्षेत्रातील इतर काही महत्त्वाच्या टेकड्यांचा ताबा घेऊन ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस भारतीय लष्कराने चीनला जोरदार धक्का दिला होता. याची तयारी भारताने मे महिन्यातच केली होती, ही बाब समोर आली आहे. तर दुसऱ्या बाजूला चीन पूर्वतयारी न करता लडाखमध्ये आपले हसे करून घेत असल्याचे समोर येत आहे.

leave a reply