मालीतील दहशतवादी हल्ल्यात २७ जवानांचा बळी

- ७० दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा

२७ जवानांचा बळीबमाको – मध्य मालीतील मोंडोरो या लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जवानांचा बळी गेला असून ३३ जवान जखमी झाले आहेत. यावेळी मालीच्या लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत ७० दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केला. गेल्या महिन्यात फ्रान्स व युरोपियन लष्कराने माघारीची घोषणा केल्यानंतर झालेला हा पहिला मोठा हल्ला ठरला आहे. या हल्ल्यामुळे माली लष्कराच्या क्षमतेवर प्रश्‍नचिन्हे उपस्थित होऊ लागली आहेत.

शुक्रवारी मालीच्या लष्कराने दिलेल्या निवेदनातून हल्ल्याची माहिती उघड झाली. दहशतवादी गटाने बुर्किना फासोच्या सीमेनजिक असलेल्या मोंडोरो तळावर भीषण स्फोट करून हल्ला चढविला. या हल्ल्यात २७ जवानांचा बळी गेला असून ३३ जण जखमी झाले आहेत. काही जखमी जवानांची प्रकृती गंभीर असून बळींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सात जवान बेपत्ता असल्याचेही लष्कराने निवेदनात म्हटले आहे.

दहशतवाद्यांनी चढविलेल्या हल्ल्याला माली लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले. मालीच्या लष्कराने केलेल्या कारवाईत ७० दहशतवाद्यांचा बळी गेल्याचे सांगण्यात येते. हे दहशतवादी ‘आयएस’ किंवा ‘अल कायदा’ संलग्न गटाचा भाग असावेत, असा दावा लष्करी सूत्रांनी केला. गेल्या दशकात २०१३ साली मालीतील कट्टरपंथिय बंडखोरांचा सरकारवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न फ्रान्सने उधळला होता. त्यानंतर फ्रान्सने २०१४ सालापासून आफ्रिकेच्या साहेल क्षेत्रात ‘ऑपरेशन बरखाने’ ही दहशतवादविरोधी मोहिम हाती घेतली होती. या मोहिमेअंतर्गत, बुर्किना फासोसह चाड, माली, नायजर व मॉरिशानिआ या देशांमधील दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई सुरू आहे. यासाठी मालीत जवळपास अडीच हजार जवान तैनात करण्यात आले होते.

 फ्रान्सबरोबरच काही युरोपिय देशही मोहिमेत सहभागी झाले होते. मात्र मालीतील लष्करी बंडावर या देशांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे लष्कराने फ्रान्ससह इतर युरोपिय देशांची हकालपट्टी केली होती. या हकालपट्टीपूर्वी मालीत रशियाच्या ‘वॅग्नर’ कंपनीचे कंत्राटी जवान तैनात करण्यात आले असून यावर पाश्‍चिमात्य देशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

leave a reply