दहशतवादी संघटना सुरक्षा परिषदेच्या निर्बंधांची खिल्ली उडवित आहेत

- संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या राजदूतांची टीका

संयुक्त राष्ट्रसंघ – भारताच्या शेजारी देशांमधील दहशतवादी संघटनांनी आपले नाव बदलून मानवतावादी संघटनांचे मुखवटा परिधान केला आहे. अशारितीने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने लादलेल्या निर्बंधांची या दहशतवादी संघटना खिल्ली उडवित आहेत, अशी टीका संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या राजदूतांनी केली. सुरक्षा परिषदेत बोलताना, थेट नामोल्लेख टाळून राजदूत तिरूमुर्ती यांनी पाकिस्तानला लक्ष्य केले आहे.

दहशतवादी संघटना सुरक्षा परिषदेच्या निर्बंधांची खिल्ली उडवित आहेत - संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या राजदूतांची टीकासंयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद रशियाकडे आले आहे. रशियाने आयोजित केलेल्या ‘जनरल इश्यूज् रिलेटिंग टू सँक्शन्स: प्रिव्हेंटिंग देअर ह्यूमनेटेरियन अँड अन इन्टेडेड कॉन्सिक्वेन्सेस’ या विषयावर चर्चासत्रात राजदूत तिरूमुर्ती बोलत होते. मानवी सहाय्यासाठी सुरक्षा परिषदेने निर्बंधांमधून दिलेल्या सवलतींचा दहशतवादी संघटना पुरता लाभ उचलत आहेत, असा ठपका तिरूमुर्ती यांनी ठेवला. ‘सुरक्षा परिषदेनेच दहशतवादी घोषित केलेल्या आमच्या शेजारी देशांमधील संघटना मानवी सहाय्य पुरविणार्‍या संघटनेचा मुखवटा परिधान करीत आहेत. नवे नाव व ही ओळख स्वीकारून या दहशतवादी संघटनांनी सुरक्षा परिषदेने लादलेल्या निर्बंधांची खिल्लीच उडविलेली आहे’, अशी जळजळीत टीका राजदूत तिरूमुर्ती यांनी केली.

‘मानवी सहाय्य पुरविणार्‍या संघटना असल्याची बतावणी करून या दहशतवादी संघटना निधी गोळा करून दहशतवाद्यांची भरतीही करीत आहेत. त्याचबरोबर सर्वसामान्यांचा मानवी ढालीसारखा वापर करण्याचे काम या दहशतवादी संघटना करीत आहेत. यामुळे आपल्या दहशतवादी कारवायांचा विस्तार दक्षिण आशिया व त्याच्या पलिकडील क्षेत्रातही करणे या संघटनांना शक्य झाले आहे’, याची जाणीव राजदूत तिरूमुर्ती यांनी या चर्चासत्रात करून दिली.

वैध मानवी सहाय्याच्या आड निर्बंध येता कामा नये, हे खरेच. पण दहशतवाद्यांचे सुरक्षित स्वर्ग म्हणून बदनाम असलेल्या ठिकाणी मानवी सहाय्याचा वापर दहशतवाद्यांसाठी केला जाऊ नये, अशी अपेक्षा आहे, अशा शब्दात भारताच्या राजदूतांनी आपली भूमिका परखडपणे मांडली आहे. ‘सुरक्षा परिषदेच्या निर्बंधांची आखणी करताना हे आव्हान लक्षात घ्यायला हवे. ही बाब लक्षात घेऊन निर्बंध लादताना आवश्यक ती दक्षता घेणे भाग आहे’, असे तिरूमुर्ती यांनी ‘सॅक्शन्स कमिटी’च्या अध्यक्षांना सुचविले.

दरम्यान, मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याचा सूत्रधार व ‘लश्कर-ए-तोयबा’चा संस्थापक असलेल्या हफीज सईद याने पाकिस्तानातच ‘जमात-उल-दवा’ ही मानवी सहाय्य पुरविणारी संघटना उभी केली होती. मात्र मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर परिस्थिती बदलली आणि हफीज सईद याला ‘फलाह-ए-इन्सानियत’ नावाच्या वेगळ्या संस्थेची स्थापना करावी लागली. त्याच्या आधीही सुरक्षा परिषदेने निर्बंध लादल्यानंतर दहशतवादी संघटना नवे नाव व ओळख घेऊन आपले काम सुरू ठेवत असल्याचे स्पष्ट झाले होते. याची दखल घेऊन भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केल्याचे दिसत आहे.

leave a reply