‘कोविड’चा लाभ घेऊन दहशतवादी संघटना आपला प्रभाव वाढवित आहेत

- ‘इंटरपोल’चा इशारा

लियॉन – जगभरात पसरलेल्या कोरोनाव्हायरसच्या साथीचा फायदा घेत दहशतवादी संघटना आपली ताकद आणि प्रभाव वाढवित आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांबरोबरच वेगवेगळ्या देशांचे राजकीय समर्थन असलेल्या ‘नॉन स्टेट अ‍ॅक्टर्स’चा देखील यात समावेश असल्याचा इशारा ‘इंटरनॅशनल पोलीस’ने (इंटरपोल) दिला. इंटरपोलने यासंबंधीचा अहवाल जगभरातील सुरक्षा यंत्रणांकडे रवाना करून सावध राहण्याची सूचना केली आहे.

काही दिवसांपूर्वी फ्रान्सस्थित इंटरपोलने ‘कोविड-१९’च्या पार्श्‍वभूमीवर, दहशतवादी संघटनांकडून वाढत असलेल्या धोक्याविषयी अहवाल तयार केला होता. यामध्ये कोविडचा उद्रेक झाल्यापासून देशाच्या पातळीवर त्याला देण्यात आलेला प्रतिसाद, लॉकडाऊन आणि आर्थिक परिणामांनंतरची सामाजिक व्यवस्था व अशा परिस्थितीत जागतिक संकटाला सामोरे जाताना सुरक्षाविषयक तयारीबाबत या अहवालात मते मांडण्यात आली होती. या अहवालात इंटरपोलने दहशतवादी संघटनांच्या वाढत असलेल्या प्रभावावर चिंता व्यक्त केली होती.

या महामारीच्या पार्श्‍वभूमीवर, दहशतवादी संघटना, कट्टरपंथी गट आणि नॉन स्टेट अ‍ॅक्टर्सच्या कारवायांवर बारीक नजर ठेवणे आवश्यक असल्याचे इंटरपोलने स्पष्ट केले. कोविडच्या सुरुवातीच्या काळात दहशतवादी संघटनांनी आपली ताकद आणि प्रभाव वाढवत नेला होता. स्थानिकांमध्ये मिसळून या दहशतवादी संघटना आपला प्रभाव वाढवित आहेत व आर्थिक बळही वाढवित असल्याचा इशारा इंटरपोलने दिला. इतर गुन्हेगारी टोळ्यांप्रमाणे दहशतवादी संघटनांनीही या कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक जमवाजमव केल्याचा दावा इंटरपोलने केला.

या साथीचा फायदा घेऊन गुन्हेगारी संघटना कोरोनाव्हायरसची लस चोरण्याची योजना आखत असल्याचा इशारा इंटरपोलने दिला.

leave a reply