इराणला इशारा देण्यासाठी इस्रायलच्या हवाई सुरक्षा यंत्रणेची चाचणी

हवाई सुरक्षा यंत्रणातेल अविव – ‘अ‍ॅरो’, ‘डेव्हिड्स स्लिंग’ अणि ‘आयर्न डोम’ या तीन हवाई सुरक्षा यंत्रणांची यशस्वी चाचणी घेतल्याचे इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. इस्रायलच्या सुरक्षेसाठी धोका ठरणार्‍या कुठल्याही पल्ल्याच्या क्रूझ् क्षेपणास्त्रांना भेदण्यात आपल्या तीनही हवाई सुरक्षा यंत्रणा यशस्वी ठरल्याचे, इस्रायलचे वरिष्ठ अधिकारी मोशे पटेल यांनी जाहीर केले. तर या हवाई सुरक्षा यंत्रणेची चाचणी घेऊन इस्रायलने इराण तसेच इराणसंलग्न गटांना इशारा दिल्याचा दावा केला जातो.

हवाई सुरक्षा यंत्रणातीनही हवाई सुरक्षा यंत्रणांची एकीकृत चाचणी घेण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. ही चाचणी कधी झाली ते इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने उघड केलेले नाही. पण इस्रायलच्या भूमीवरुन तसेच भूमध्य समुद्रातही या यंत्रणांची चाचणी घेण्यात आली. यावेळी ड्रोन्स, रॉकेट्स तसेच क्रूझ् क्षेपणास्त्रांना हवाई सुरक्षा यंत्रणांनी यशस्वीरित्या लक्ष्य केले, अशी माहिती इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने दिली.

हवाई सुरक्षा यंत्रणायापैकी ‘अ‍ॅरो’च्या सहाय्याने लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र भेदण्यात आले. तर मध्यम पल्ल्याची क्रूझ् क्षेपणास्त्रे ‘डेव्हिड्स स्लिंग’ यंत्रणेने भेदली. या चाचणीसाठी ‘डेव्हिड्स स्लिंग’च्या नवी आवृत्तीचा वापर करण्यात आला. गाझापट्टीतील रॉकेट हल्ल्यांना तसेच ड्रोन्सना भेदण्यासाठी वापरल्या जाणार्‍या ‘आयर्न डोम’च्या नव्या क्षमतेची चाचणी घेण्यात आली. इस्रायलच्या सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या या तीनही हवाई सुरक्षा यंत्रणेची ही चाचणी म्हणजे महत्त्वाचा टप्पा असल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने केला.

बहुस्तरीय हवाई सुरक्षा यंत्रणांच्या या चाचणीबरोबर इस्रायल एकाचवेळी अनेक हल्ल्यांना तोंड देण्यासाठी सज्ज झाल्याची प्रतिक्रिया इस्रायली संरक्षण मंत्रालयाच्या ‘मिसाईल डिफेन्स ऑर्गनायझेशन’चे प्रमुख (निवृत्त) कर्नल मोशे पटेल यांनी दिली. त्याचबरोबर अरब देशांबरोबरील सहकार्यावर बोलताना, या हवाई सुरक्षा यंत्रणांची युएई आणि बाहरिन यांना विक्री केली जाणार नसल्याचे मोशे पटेल यांनी सांगितले. पण भविष्यात याविषयी विचार होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

leave a reply