अफगाणिस्तानच्या लष्कराने तालिबानवरील हल्ले वाढविले

- 24 तासात 207 दहशतवादी ठार

अफगाणिस्तानच्या लष्करानेकाबुल – गेल्या चोवीस तासात अफगाणिस्तानच्या लष्कराने आठ प्रांतांमध्ये केलेल्या कारवाईत तालिबानच्या 207 दहशतवाद्यांना ठार केले. यामध्ये फरयाब प्रांतात केलेल्या हवाई हल्ल्याचा समावेश आहे. तर कंदहार प्रांतावर वर्चस्व असणार्‍या तालिबानने स्थानिक विनोदी कलाकाराचा बळी घेतल्यामुळे स्थानिक संतापले आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानातील शांतीचर्चेला गती मिळाली नाही, तर आंतरराष्ट्रीय समुदाय तालिबानला मान्यता देणार नसल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने दिला आहे.

गेल्या काही आठवड्यांमध्ये तालिबानने ताब्यात घेतलेल्या जिल्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अफगाणी सुरक्षा यंत्रणांनी मोठी मोहीम छेडली असून या मोहिमेला यश मिळत असल्याचे बोलले जाते. गेल्या चोवीस तासात अफगाणी लष्कराने कंदहार, झाबुल, हेरात, जोझवान आणि हेल्मंडमध्ये केलेल्या कारवाईत तालिबानच्या 189 दहशतवाद्यांना ठार केले. तसेच तालिबानने ताब्यात घेतलेली लष्कराची वाहनेही परत मिळविली.

तर बुधवारी सकाळी अफगाणी लष्कराने फरयाब प्रांतात चढविलेल्या हवाई हल्ल्यात 19 दहशतवाद्यांना संपविले. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने या कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांचे फोटो प्रसिद्ध केले असून यामध्ये पाकिस्तानातील दहशतवाद्याचा समावेश असल्याचे म्हटले आहे. याआधीही अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी कारवाईत पाकिस्तानी लष्कराचे जवान व दहशतवादी सहभागी असल्याचे उघड झाले होते.

leave a reply