आंतरराष्ट्रीय पातळीवरील उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्था उत्तम कामगिरी करीत आहे

-रिझर्व्ह बँकेच्या अर्थतज्ञांचा दावा

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय पातळीवर फार मोठ्या उलथापालथींचे धक्के बसत असताना देखील, इतर देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था उत्तम कामगिरी करीत आहे. याचे कारण देशाची अर्थव्यवस्था एका नाही तर अनेक आधारांवर उभी राहिलेली आहे. यामुळे आंतराष्ट्रीय पातळीवरील धक्के सहन करण्याची क्षमता भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झाली आहे, असे रिझर्व्ह बँकेच्या ‘मॉनेटरी पॉलिसी कमिटी-पतधोरणविषयक समिती’च्या सदस्या आशिमा गोयल यांनी म्हटले आहे.

ashima goyaजगभरात होणाऱ्या उलथापालथींचा परिणाम भारताच्या उद्योगक्षेत्रावर झाला तरी भारताचे कृषी क्षेत्र चांगली कामगिरी करून दाखवते. लॉकडाऊनच्या काळात उद्योगक्षेत्र मरगळलेल्या स्थितीत असताना, डिजिटायजेशनला मिळालेली चालना अर्थव्यवस्थेला गती देणारी ठरली, याकडे गोयल यांनी लक्ष वेधले. यामुळे भारतीय अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेत अधिक चांगली कामगिरी करू शकली, असा दावा अशिमा गोयल यांनी केला आहे. याबरोबरच आधीच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवरील निर्यातीमधील भारताचा वाटा फारच कमी होता. पण आता त्यात वाढ होत आहे, याचीही नोंद गोयल यांनी केली.

याबरोबरच देशातून वाढत असलेली मागणी फार मोठ्या आर्थिक आव्हानांना तोंड देण्याची अर्थव्यवस्थेची क्षमता विकसित करीत असल्याचे निरिक्षण गोयल यांनी नोंदविले आहे.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढविल्यानतंर, आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनी अधिक परताव्याच्या अपेक्षेने इतर देशांमधील आपली गुंतवणूक काढून अमेरिकेकडे वळविली. याचा फार मोठा फटका विकसित व श्रीमंत मानल्या जाणाऱ्या देशांनाही बसला होता. भारतातील गुंतवणुकीवरही याचा परिणाम झाला आणि भारताच्या परकीय गंगाजळीत यामुळे घट झाली होती. पण याच काळात देशातील गुंतवणुकीत फार मोठी वाढ झाली. याच्या प्रभावामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनी मागे घेतलेल्या गुंतवणुकीचा फार मोठा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसला नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याचा उल्लेख केला होता.

कोरोनाची साथ व त्यानंतर पेटलेल्या युक्रेनच्या युद्धाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत असताना पाश्चिमात्यांच्या तुलनेत आशियाई देशांच्या अर्थव्यवस्था या संकटांना अधिक चांगल्यारितीने तोंड देत असल्याचे दावे अर्थतज्ञ करीत आहेत. त्यातही भारतीय अर्थव्यवस्थेची क्षमता या संकटाच्या काळात सिद्ध झाल्याचा दावाही काही विश्लेषकांनी केला आहे. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवरील आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा विश्वास अधिकच वाढेल, असे दावे केले जातात. याचे परिणाम दिसू लागले असून पुन्हा एकदा भारतात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत.

पुढच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था सर्वाधिक आश्वासक वेगाने प्रगती करील, असा निष्कर्ष आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था देखील नोंदवित आहेत.

leave a reply