टोकिओ – अमेरिका व चीनमधील स्पाय बलूनचा वाद तसेच अमेरिकेतील ‘युएफएचओ’चे रहस्य अजूनही सुटलेले नाही. तोच जपानच्या किनारपट्टीजवळ गूढ मेटल बॉल सापडल्यामुळे गोंधळ उडाला आहे. सदर मेटल बॉल म्हणजे परग्रहवासियांची तबकडी तसेच गॉडझिला किंवा ड्रॅगनचे अंडे तर नाही ना, असे तर्क माध्यमांमधून लावले जात आहेत.
दोन दिवसांपूर्वी साधारण दीड मीटर रुंद असलेला सदर मेटल बॉल जपानच्या हामामात्सू किनारपट्टीजवळ आढळले. समुद्राच्या लाटांबरोबर हे गूढ बॉल किनाऱ्यावर आल्याचा दावा स्थानिकांनी केला. जपानी यंत्रणेच्या दोन अधिकाऱ्यांनी या मेटल बॉलची पाहणी केली. पण जपानी अधिकारी देखील कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे या मेटल बॉलचे गूढ अधिकच वाढले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका व चीनमध्ये स्पाय बलूनचा वाद पेटला आहे. दोन्ही देश एकमेकांवर हेरगिरीसाठी बलून सोडल्याचे आरोप करीत आहेत. त्याचबरोबर अमेरिकेच्या हवाई क्षेत्रात चित्रविचित्र फ्लाईंग ऑब्जेक्ट पाहिल्याच्या बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर, जपानच्या किनारपट्टीजवळ सापडलेला मेटल बॉल गेल्या काही दिवसांमधील गूढ वाढवित आहे.