जगभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 20 कोटींवर

- अमेरिका, रशिया, जपानमध्ये साथीची तीव्रता वाढली

रुग्णांची संख्यावॉशिंग्टन/मॉस्को – जगभरात कोरोनाच्या साथीची तीव्रता पुन्हा एकदा वाढत असल्याचे समोर येत आहे. अमेरिका, रशिया, चीन, जपान यासारख्या प्रमुख देशांसह इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि लॅटिन अमेरिका तसेच आफ्रिका खंडात रुग्ण तसेच बळींची संख्या वाढत असल्याची माहिती देण्यात आली आहे. जगभरातील कोरोनामुळे बळी पडलेल्यांची संख्या 43 लाखांच्या पुढे गेली असून एकूण रुग्णांची संख्या 20.7 कोटींवर पोहोचली आहे.

2019 सालच्या अखेरीस चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीने जगभरात उडविलेला हाहाकार अद्यापही कायम आहे. जगातील अनेक प्रमुख देशांमध्ये साथीची दुसरी व तिसरी लाट सुरू आहे. यामागे कोरोनाचा ‘डेल्टा व्हेरिअंट’ कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे. अमेरिकेच्या ‘जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी’ने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 20 कोटी, 72 लाखांवर गेली आहे. तर 43 लाख, 64 हजारांहून अधिक जण साथीत दगावले आहेत.

अमेरिकेतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या साडेतीन कोटींवर गेली. गेल्या आठवड्यात नऊ लाखांहून अधिक रुग्णांची भर पडली आहे. येत्या काही दिवसात अमेरिकेत प्रतिदिनी दोन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झालेली दिसेल, असा इशारा ‘नॅशनल इन्स्टिट्यूटस्‌ ऑफ हेल्थ’चे संचालक डॉक्टर फ्रान्सिस कॉलिन्स यांनी दिला. अमेरिकेत कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये सुमारे दोन हजार मुलांचा समावेश असल्याचेही समोर आले आहे. कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या एकूण रुग्णांपैकी अडीच टक्के रुग्ण मुले असल्याचेही सांगण्यात येते.

आतापर्यंत अमेरिकेत 90 हजारांहून अधिक मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. 12 वर्षांखालील मुलांना लसीकरणाची परवानगी नसल्याने त्यांना कोरोनाच्या नवनव्या ‘व्हेरिअंटस्‌’चा सर्वाधिक धोका असल्याचे तज्ज्ञांनी बजावले आहे. अमेरिकेत कोरोनामुळे बळी जाणाऱ्यांची संख्या 6 लाख, 21 हजारांवर पोहोचली. गेल्या आठवड्यात साडेचार हजारांहून अधिक बळींची नोंद झाली आहे. अमेरिकेतील 40हून अधिक प्रांतांमध्ये कोरोनाचा प्रसार पुन्हा वेगाने होण्यास सुरुवात झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

रुग्णांची संख्यारशियातही कोरोनाचा फैलाव वाढत असल्याचे समोर येत आहे. गेले काही दिवस रशियात प्रतिदिन 20 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. त्याचवेळी गेले चार दिवस सलग 800हून अधिक जणांचा बळी जात असल्याची माहितीही समोर आली आहे. सोमवारी रशियात 20 हजार 765 रुग्णांची नोंद झाली असून, 806 जणांचा बळी गेल्याची माहिती ‘मॉस्को टाईम्स’ या दैनिकाने दिली आहे. रशियात आतापर्यंत 65 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली असून एक लाख, 68 हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. लसीकरणाला असणारा विरोध हे रशियातील कोरोनाच्या फैलावाचे प्रमुख कारण असल्याचे समोर येत आहे.

जपानमध्ये सलग तीन दिवस 20 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली असून राजधानी टोकिओ प्रमुख ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. राजधानी टोकिओत सलग तीन दिवस पाच हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. या सलग वाढीनंतर जपान सरकारने राजधानी टोकिओसह काही भागांमधील आणीबाणी 12 सप्टेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. जपानमध्ये आतापर्यंत 11.5 लाख रुग्णांची नोंद झाली, तर 15 हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे.

ऑस्ट्रेलियात सिडनीपाठोपाठ मेलबर्न या शहरामध्येही कठोर लॉकडाऊन लावण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या ‘एनएसडब्ल्यू’ प्रांतामध्ये 24 तासांमध्ये 400 हून अधिक रुग्ण आढळले असून हा नवा रेकॉर्ड असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आफ्रिका खंडातील कोरोना रुग्णांची संख्या 72 लाख, 57 हजारांवर पोहोचली, तर एक लाख, 82 हजारांहून अधिक बळी गेल्याचे ‘आफ्रिका सीडीसी’ने सांगितले. आग्नेय आशियातील इंडोनेशियामध्येही साथीची तीव्रता वेगाने वाढत आहे. इंडोनेशियामध्ये गेल्या आठवड्यात 10 हजारांहून अधिक बळी गेल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली.

leave a reply