इराणच्या आणखी एका अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

तेहरान – इराणमधील रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या अधिकाऱ्यांच्या संशयास्पद मृत्यूचे सत्र अजूनही सुरू आहे. रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या एरोस्पेस कमांडमधील लेफ्टनंट पदावरील अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. या आठवड्यात एरोस्पेस कमांडशी संबंधित तिसऱ्या अधिकाऱ्याचा संशयास्पदरित्या बळी गेला आहे. इराणची माध्यमे या हल्ल्यांसाठी इस्रायलला जबाबदार धरत आहेत. इराणच्या सोशल मीडियावर शुक्रवारी एक पोस्टर प्रसिद्ध झाले. यामध्ये ‘वहाब प्रेमारझियान’ या अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे म्हटले होते. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या एरोस्पेस कमांडमध्ये काम करणाऱ्या वहाबचा इराणच्या माराघेह शहरात मृत्यू झाला. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी वहाबच्या मृत्यूबाबत कुठलीही माहिती उघड करण्याचे टाळले.

iran-IRGCया आठवड्याच्या सुरुवातीलाच रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या एरोस्पेस विभागाचे दोन जवान ठार झाले होते. आपले जवान वेगवेगळ्या सराव मोहिमांवर असताना शहीद झाल्याचे इराणचे म्हणणे आहे. पण ड्रोनच्या तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या आपल्या या दोन्ही जवानांच्या मृत्यूबाबत रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍स माहिती दडवित असल्याचा दावा केला जातो. तसेच इराणच्या शत्रूंनी रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या जवानांचा बळी घेतल्याचा संशय इराणची माध्यमे व्यक्त करीत आहेत.

याआधी 2020 साली इराकमधील बगदाद विमानतळाच्या आवारात इराणच्या कुद्स फोर्सेसचे प्रमुख कासिम सुलेमानी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाले होते. अमेरिकेच्या या कारवाईसाठी इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादने सहाय्य करण्याचा आरोप इराण करीत आहे. तर 2020च्या नोव्हेंबर महिन्यात इराणचे प्रमुख शास्त्रज्ञ मोहसिन फखरीझादेह यांची राजधानी तेहरानमध्ये गोळ्या घालून हत्या झाली होती. यासाठी देखील इराणने मोसादला जबाबदार धरले होते.

गेल्या दोन महिन्यांमध्ये इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित शास्त्रज्ञ तसेच रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍स आणि कुद्स फोर्सेसशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर हल्ले चढविले जात आहेत. तसेच इराणच्या लष्कराशी जोडलेल्या ठिकाणी संशयास्पदरित्या स्फोट झाल्याचे उघड झाले होते. इस्रायलने इराणविरोधात पुकारलेल्या छुप्या युद्धाचा हा एक भाग असल्याचा दावा केला जातो.

leave a reply