युक्रेन संघर्षामुळे पाश्चिमात्यांचे वर्चस्व संपुष्टात येईल

- हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन

बुडापेस्ट – युक्रेनमध्ये सुरू असणाऱ्या युद्धात पाश्चिमात्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील वर्चस्व संपविण्याची क्षमता आहे, असा इशारा हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी दिला. पाश्चिमात्य देश हे युद्ध लष्करीदृष्ट्या जिंकण्याची शक्यता नसल्याचेही हंगेरीच्या पंतप्रधानांनी बजावले आहे. एका जर्मन मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ऑर्बन यांनी, युक्रेनमधील संघर्ष संपल्यानंतर युरोपिय महासंघ कमकुवत झालेला दिसेल, असा निष्कर्ष नोंदविला आहे.

hungaryरशिया-युक्रेन युद्धाला पाच महिन्यांहून अधिक काळ उलटला आहे. या कालावधीत अमेरिका व युरोपिय देशांसह काही मित्रदेशांनी युक्रेनला समर्थन दिले आहे. मात्र युरोपातही युक्रेनच्या समर्थनावरून एकवाक्यता नसून हंगेरीसारखे काही देश सातत्याने विरोध करीत आहेत. हंगेरीच्या पंतप्रधानांनी गेल्या काही दिवसात युक्रेन युद्ध, निर्बंध यासारख्या मुद्यांवरून युरोपवर टीकास्त्र सोडले होते.

एका जर्मन मासिकाला दिलेल्या मुलाखतीतही ऑर्बन यांनी, युक्रेन युद्धावरून टाकलेले निर्बंध अपयशी ठरल्याचा आरोप केला. हे निर्बंध युरोपवरच उलटले असल्याचे ऑर्बन यांनी सांगितले. त्याचवेळी रशिया-युक्रेन युद्धात सर्व देश अमेरिकेच्या मागे नाहीत, याचीही ऑर्बन यांनी परखड शब्दात जाणीव करून दिली.

‘चीन, भारत, ब्राझिल, दक्षिण आफ्रिका, अरब देश तसेच आफ्रिका खंड यांनी युक्रेनच्या संदर्भातील पाश्चिमात्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे पुढील काळात हे युद्धच कदाचित पाश्चिमात्यांचे वर्चस्व संपविणारे ठरेल’, असा इशारा ऑर्बन यांनी दिला. गेल्या महिन्यात केलेल्या वक्तव्यात हंगेरीच्या पंतप्रधानांनी, युक्रेन युद्धानंतर बहुस्तंभीय जागतिक व्यवस्था आकारास येईल, असा दावा केला होता.

हंगेरीच्या नेतृत्त्वाप्रमाणे अमेरिका व नाटोच्या विरोधात सर्वच युरोपिय देशांनी उघडपणे भूमिका घेतलेली नाही. पण नाटोचे सदस्य असलेल्या युरोपिय देशांनाही युक्रेनच्या युद्धाचे परिणाम सहन करावे लागत आहेत. इंधन व अन्नधान्याची टंचाई यामुळे युरोपिय देशांची जनता ग्रासलेली आहे. अशा परिस्थितीत युक्रेनचे युद्ध रोखण्याच्या ऐवजी हे युद्ध लांबविण्याचे आरोप अमेरिका व रशियाविरोधी देशांवर केले जात आहेत. यामुळे काही युरोपिय देश नाराज असून पुढच्या काळात त्यांची नाराजी उघडपणे समोर येऊ शकते.

युक्रेनचे पंतप्रधान झेलेन्स्की नाही, तर अमेरिकेतील प्रख्यात विश्लेषकांनीही युक्रेनचे युद्ध भडकवण्याचे विपरित परिणाम रशियाला नाही, तर अमेरिकेला सहन करावे लागत असल्याचा इशारा दिला. युक्रेनच्या युद्धामुळे रशिया अधिकच स्वावलंबी झाला असून या युद्धाच्या काळात रशियाची इंधन निर्यात प्रचंड प्र्रमाणात वाढलेली आहे, याकडे अमेरिकन विश्लेषकांनी लक्ष वेधले.

याबरोबरच आंतरराष्ट्रीय चलन असलेल्या अमेरिकन डॉलरचे स्थान युक्रेन युद्धामुळे धोक्यात आले आहे, कारण रशियाने रूबल व इतर देशांच्या चलनामध्ये व्यवहार करण्याची सुरुवात केली आहे. त्यामुळे युक्रेनच्या युद्धाचे अमेरिका व युरोपिय देशांना लाभ मिळण्याच्या ऐवजी या युद्धाने त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रभावाला धक्का बसला आहे, असे अमेरिकी विश्लेषक बजावत आहे. हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी ही बाब पुन्हा एकदा लक्षात आणून दिल्याचे दिसते आहे.

leave a reply