अमेरिका बांगलादेशमधील सरकार उलथण्याचा प्रयत्न करीत आहे

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांचा गंभीर आरोप

ढाका/वॉशिंग्टन – ‘अमेरिकेकडे दुसऱ्या देशांमधील सरकार उलथण्याची ताकद आहे. बांगलादेशबाबतही अमेरिका हेच करण्याच्या प्रयत्नात आहे. आपल्या देशातील लोकशाहीवादी सरकार पलथून येथे लोकशाहीच उरणार नाही, असे सरकार प्रस्थापित करण्याचा अमेरिकेच प्रयत्न आहे. अमेरिकेची ही कारवाई पूर्णपणे लोकशाहीविरोधी ठरते’, असा गंभीर आरोप बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी केला.

bangladesh-hasina-us-bidenदोन दिवसांपूर्वी बांगलादेशच्या संसदेतील अधिवेशनात बोलताना पंतप्रधान शेख हसिना यांनी अमेरिकेवर सडकून टीका केली. लोकशाहीचा कैवार घेणारी अमेरिकाच लोकशाहीवादी देशांविरोधात कारवाई करीत असल्याचा ठपका बांगलादेशच्या पंतप्रधानांनी ठेवला. बांगलादेशमधील लोकशाही व्यवस्था उलथून आपल्या देशात लोकशाहीविरोधी राजवट प्रस्थापित करण्याचा प्रयत्न अमेरिका करीत असल्याचा आरोप पंतप्रधान हसिना यांनी केला. मानवाधिकारांबाबत आम्हाला उपदेश करणारी अमेरिका स्वत:च्या देशातील मानवाधिकारांच्या उल्लंघनाकडे कानाडोळा करते, असे ताशेरे बांगलादेशच्या पंतप्रधानांनी ओढले.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतील बायडेन प्रशासनाने मानवाधिकार, मुक्त आणि पारदर्शी निवडणूकांच्या मुद्यावरुन बांगलादेशच्या सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. बांगलादेशमधील पंतप्रधान हसिना यांच्याकडून विरोधकांवर विनाकारण कारवाई केली जात असल्याची भुवया उंचावणारी टीका अमेरिकेने केली होती. तसेच बायडेन प्रशासनाने बांगलादेशच्या ‘रॅपिड ॲक्शन ब्रिगेड’वर बंदी लादली होती. ही लोकशाहीविरोधी लष्करी संघटना असल्याचा आरोप केला होता. तर काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेतील ‘डेमोक्रसी सिमेट’मध्ये बांगलादेशला वगळले, पण पाकिस्तानला आमंत्रित केले. अमेरिकेने दुसऱ्यांदा बांगलादेशबाबत अशी भूमिका घेतली होती. अमेरिका आपल्या देशाबाबत कायम अशीच दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका बांगलादेशमधून झाली होती.

१९७१च्या युद्धात अमेरिकेने बांगलादेशची स्थापना होऊ नये, यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला पूर्ण पाठिंबा दिला होता. बांगलादेश ‘बास्केट केस’ असल्याचा शेरा अमेरिकेच्या तत्कालिन नेत्यांनी मारला होता. बांगलादेश जास्त काळ टिकाव धरू शकणार नाही, या देश कोसळेल, असा दावा अमेरिकन नेत्यांनी केला होता.

leave a reply