शांततेच्या दुष्काळामुळे जग यातना सहन करीत आहे

ख्रिस्तधर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस

व्हॅटिकन सिटी – युक्रेनच्या संवेदनाहीन संघर्षात अन्नाचा हत्यारासारखा वापर केला जात असून जग सध्या शांततेच्या दुष्काळामुळे होणाऱ्या यातना भोगत आहे, असे ख्रिस्तधर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू आदरणीय पोप फ्रान्सिस यांनी म्हटले आहे. ख्रिसमसनिमित्त व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर्स बॅसिलिकामधून दिलेल्या संदेशात त्यांनी, सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या महायुद्धात युक्रेनबरोबरच अफगाणिस्तान, येमेन, सिरिया, म्यानमार, लेबेनॉन, इस्रायल-पॅलेस्टाईन, हैती व इराणमधील नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या हालअपेष्टांचाही उल्लेख केला. जगातील जबाबदार राजकीय नेत्यांनी अन्नधान्याचा शांततेसाठीच वापर होईल, पुढाकार घ्यावा, असे आवाहनही पोप फ्रान्सिस यांनी केले.

famine of peaceयापूर्वी रशिया-युक्रेन युद्धावर संबोधित करताना पोप फ्रान्सिस यांनी सातत्याने, जग तिसऱ्या महायुद्धाच्या काळातून जात असल्याचे बजावले होते. त्याचवेळी रशिया व युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात संघर्षविराम व्हावा यासाठी काहीही करण्यास आपण तयार असून मध्यस्थीसाठीही प्रयत्न करु, या शब्दात त्यांनी शांततेसाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली होती. ख्रिसमसच्या सणानिमित्त दिलेल्या संदेशातही पोप फ्रान्सिस यांनी जागतिक शांततेच्या मुद्यावर भर दिला.

युक्रेनमधील जनता ख्रिसमसच्या काळातही अंधार व कडाक्याच्या थंडीचा सामना करीत आहे, याची जाणीव पोप फ्रान्सिस यांनी करून दिली. युद्धाचे थंडगार वारे मानवतेला दोन्ही बाजूंनी धक्के देत असल्याकडे ख्रिस्तधर्मियांच्या सर्वोच्च धर्मगुरुंनी लक्ष वेधले. जे कोणी यातना व हालअपेष्टा सहन करीत आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी आपल्या सर्वांना सामर्थ्य देण्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करुया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

‘जगातील प्रत्येक युद्धात अन्नधान्याचा शस्त्रासारखा वापर होतो व त्यामुळे ज्यांच्याकडे अन्नधान्याची टंचाई आहे त्यांना योग्य अन्नधान्य पुरविण्यात अडथळे येतात. युक्रेनमधील युद्धाने ही परिस्थिती अधिकच बिकट केली असून अफगाणिस्तान व आफ्रिका खंडातील देशांमध्ये दुष्काळ तसेच उपासमारीचा धोका निर्माण झाला आहे’, या शब्दात ख्रिस्तधर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू आदरणीय पोप फ्रान्सिस यांनी गंभीर संकटाची जाणीव करून दिली.

leave a reply