भारताचे पंतप्रधान व युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची फोनवरून चर्चा

नवी दिल्ली – रशिया व युक्रेनमधील युद्धाची भीषणता वाढलेली असताना, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदोमिर झेलेन्स्की यांनी फोनवरून भारताच्या पंतप्रधानांशी चर्चा केली. रशिया व युक्रेनचे युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी एका आराखड्यावर काम केले जात आहे. यात भारताची भूमिका अतिशय महत्त्वाची असेल, असे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की या चर्चेत म्हणाल्याचे वृत्त आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनीच सोशल मीडियावर याची माहिती दिली.

Narendra-modiरशियाने युक्रेनवरील हल्ल्याची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढविली असून रशियाच्या क्षेपणास्त्रे, रॉकेट्स व तोफांच्या भीडामारामुळे युक्रेनच्या शहरांची दैना उडाली आहे. त्यातच रशियाने युक्रेनच्या वीजनिर्मिती व वितरण व्यवस्थेला लक्ष्य केल्याने कडक हिवाळ्यात युक्रेनच्या जनतेसमोर भयंकर संकट खडे ठाकले आहे. मात्र रशिया हे युद्ध संपविण्याच्या ऐवजी अधिक लांबवित असल्याचा आरोप आता युरोपिय देश करीत आहेत. अशा परिस्थितीत रशियाला हे युद्ध थांबविण्याचे प्रस्ताव दिले जात आहेत. मात्र रशिया त्याला प्रतिसाद देण्यास तयार नसल्याचे दिसते.

अशा परिस्थितीत युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताच्या पंतप्रधानांशी फोनकरून भारताच्या रशियावरील प्रभावाचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याचे संकेत मिळत आहेत. याआधीही रशिया केवळ भारताचेच ऐकेल, असे दावे युक्र्रेनच्या नेत्यांनी व राजनैतिक अधिकाऱ्यांनी केले होते. म्हणूनच भारताने रशियावरील आपल्या प्रभावाचा वापर करून रशियाचे युक्रेनवरील हल्ले थांबवावेत, असे आवाहन युक्रेनचे नेते व राजनैतिक अधिकारी करीत होते. मात्र भारताने युक्रेनचे युद्ध रोखण्यासाठी आवाहन करीत असतानाच, रशियाचे सुरक्षाविषयक हितसंबंध जपणे आवश्यक असल्याची जाणीव युक्रेनसह पाश्चिमात्य देशांनाही करून दिली होती.

दरम्यान, पंतप्रधान मोदी व युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यातील चर्चेची भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही दिली आहे. युक्रेनचे युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित करण्याच्या सर्वच प्रयत्नांना भारताचे सहाय्य असेल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना दिली. दोन्ही देशांनी युद्ध थांबवून ही समस्या सोडविण्यासाठी शाश्वत मार्ग काढावा व असा मार्ग केवळ राजनैतिक चर्चेतूनच निघेल, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भारताची भूमिका मांडली.

leave a reply