सायबर हल्ल्यांमुळे युरोपमधील हजारोजण ऑफलाईन

ऑफलाईनपॅरिस – रशिया-युक्रेन संघर्षामुळे लवकरच सायबर युद्ध पेटेल, अशी दाट शक्यता वर्तविण्यात येत होती. गेल्या काही दिवसांपासून युरोपमधून येणार्‍या बातम्या पाहता, हा इशारा प्रत्यक्षात उतरल्याचे दिसत आहे. युरोपमध्ये सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरविणार्‍या वेगवेगळ्या कंपन्यांवर सायबर हल्ले झाले आहेत. यामुळे हजारो जणांना काही तासांसाठी ‘इंटरनेट ब्लॅकआऊट’चा सामना करावा लागला. आपल्या समोर उभ्या ठाकलेल्या सर्वात मोठ्या सायबर युद्धाचा हा अगदी प्राथमिक टप्पा असल्याचा इशारा युरोपातील विश्‍लेषक देत आहेत.

फ्रान्स, जर्मनी, हंगेरी, ग्रीस, इटली आणि पोलंड या युरोपीय देशांमध्ये सायबर हल्ल्यांचा सर्वाधिक परिणाम झाल्याचे समोर आले आहे. त्यातही फ्रान्सच्या ‘ऑरेंज’ आणि ‘युटेलसॅट’ या दोन कंपन्यांच्या हजारो ग्राहकांना सायबर हल्ल्यांचा फटका बसला. ऑरेंज कंपनीचे नऊ हजार, तर युटेलसॅट कंपनीचे जवळपास १३ हजार ग्राहक गेल्या आठवड्यात सायबर हल्ल्याचे शिकार बनले होते. ऑरेंज कंपनीला सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरविणार्‍या अमेरिकेच्या वायासॅट कंपनीचे युक्रेनमधील ग्राहक देखील या सायबर हल्ल्याच्या कचाट्यात सापडल्याचा दावा केला जातो.

फ्रान्सच्या स्पेस कमांडचे प्रमुख जनरल मिशेल फ्रेडलींग यांनी या सायबर हल्ल्याची कबुली दिली. ‘गेल्या आठवड्यात २४ फेब्रुवारी रोजी रशिया-युक्रेनमध्ये संघर्ष सुरू झाला. युरोपसह युक्रेनमधील सॅटेलाइट नेटवर्क बाधित झाले. यामुळे या सॅटेलाइट नेटवर्कशी संबंधित असलेले हजारो ग्राहक ऑफलाईन गेले होते’, अशी माहिती जनरल फ्रेडलींग यांनी दिली. याशिवाय जर्मनी आणि मध्य युरोपला जवळपास ११ गिगावॅट क्षमतेची ऊर्जा पुरविणार्‍या ५,८०० पवनचक्क्या देखील बाधित झाल्या होत्या. पवनचक्क्या सुरू झाल्या असल्या तरी, त्या पहिल्यासारख्या काम करीत नसल्याचे जर्मन कंपनीचे म्हणणे आहे.

या सायबर हल्ल्यांसाठी युरोपिय देशांनी अद्याप कोणालाही जबाबदार धरलेले नाही. पण रशिया-युक्रेनमधील संघर्षामुळे सायबर हल्ले वाढू शकतात, अशी चिंता लष्करी आणि सायबर विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. या सायबर हल्ल्यांची तीव्रता फक्त रशिया व युक्रेनच्या जनतेपर्यंत मर्यादित न राहता, आंतरराष्ट्रीय स्तरावर याचा प्रभाव पाहायला मिळेल आणि हे एक प्रकारचे ‘सायबर अर्मागॅडन’ (सायबर क्षेत्रातील महायुद्ध) ठरेल, असा इशाराही हे लष्करी व सायबर विश्‍लेषक देत आहेत.

युरोपवर सायबर हल्ले झाले, त्याच दिवशी रशियातील काही संकेतस्थळांवरही सायबर हल्ले झाल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर युक्रेनने शेकडो सदस्य असलेल्या हॅकर्सचे लष्करच सायबर हल्ल्यासाठी सज्ज ठेवल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे युरोपमध्ये झालेल्या या सायबर हल्ल्यासाठी फ्रान्स आणि जर्मनीने रशियावर आरोप करण्याचे टाळले आहे. पण रशिया लवकरच पाश्चिमात्य देशांवर सायबर हल्ले घडवेल, असा दावा अमेरिकन माध्यमे करीत आहेत.

leave a reply