चाड लष्कराच्या कारवाईत ‘बोको हराम’चे हजार दहशतवादी ठार

इंजामिना – चाडच्या लष्कराने आपल्या सीमाभागात केलेल्या कारवाईत बोको हराम या दहशतवादी संघटनेच्या एक हजार दहशतवाद्यांना ठार केले. या कारवाईत आपले ५२ सैनिक मारले गेल्याची माहिती लष्करातर्फे देण्यात आली. बोको हरामने गेल्या महिन्यात केलेल्या दहशतवादी हल्यात १०० सैनिक मारले गेले होते. त्यानंतर बोको हराम विरोधात ही आक्रमक कारवाई हाती घेण्यात आली होती.

बोको हरामचा दहशतवादी हल्ल्यानंतर ३१ मार्च रोजी चाडच्या लष्कराने दहशतवाद्यांविरोधात कारवाई हाती घेतली होती. या कारवाईत ५० बोटी नष्ट करण्यात आल्याचे चाडच्या लष्कराचे प्रवक्ते कर्नल अझम बर्मेंडोआ अगौना म्हणाले. ही कारवाई चाड सीमेवर करण्यात आली.

चाडच्या लष्कराने बोको हरामची दोन बेटे ताब्यात घेतली असून नायजर आणि नायजेरियाच्या सीमेवरील ‘चाड लेक’च्या काठावर सैनिकांना तैनात करण्यात आले आहे. बोको हराम विरोधात हाती घेण्यात आलेली कारवाई पूर्ण झाली आहे. या कारवाईत चाडचे बरेच सैनिक जखमी झाल्याचे सांगण्यात येते. बोको हरामने गेल्या महिन्यात केलेला हल्ला आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होता.

२००९ पासून ईशान्य नायजेरियात आपल्या कारवायांना सुरुवात करणाऱ्या बोको हरामच्या हिंसाचारात ३० हजार जण ठार झाले असून २० लाख नागरिकांना पलायन करावे लागले आहे.

बोको हराम ही दहशतवादी संघटना अल कायदासंलग्न आहे. काही वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात बोको हराम आफ्रिकेतील सर्वात धोकादायक व हिंसक दहशतवादी संघटना असल्याचे सांगण्यात आले होते. गेल्या दशकात स्थापन झालेल्या बोको हरामला संपवल्याचे दावे नायजेरियन सरकारकडून करण्यात आले आहेत. मात्र, दर वेळी मोठे व भीषण हल्ले करून या संघटनेने आपली ताकद दाखवून दिली आहे.

leave a reply