व्यापारमंत्री पियूष गोयल अमेरिकेच्या दौऱ्यावर

सॅन फ्रॅन्सिस्को – अमेरिका सध्या दुसऱ्या कुठल्याही देशाबरोबर मुक्त व्यापारी करार करण्यासाठी उत्सुक नाही. पण जर अमेरिकेला भारताशी मुक्त यापारी करार करायचा असेल, तर भारत त्यासाठी निश्चितच तयार होईल, असे व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी म्हटले आहे. सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या गोयल यांनी हे विधान करून बायडेन प्रशासनाच्या भारतविषयक धोरणावर नेमके बोट ठेवल्याचे दिसते. भारत कॅनडाबरोबरही मुक्त व्यापारी करारावर चर्चा करीत असून युरोपिय महासंघाबरोबरील भारताची मुक्त व्यापारी करारावरील चर्चा पुढे चालली आहे, याची जाणीव व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी करून दिली.

Piyush Goyal to visit USगेल्या काही वर्षांपासून भारत व अमेरिकेने आपल्या व्यापारी सहकार्यात मोठी वाढ करण्याचे ध्येय समोर ठेवले होते. उभयपक्षी वार्षिक व्यापार सुमारे 500 अब्ज डॉलर्सवर नेण्याची घोषणा दोन्ही देशांच्या नेत्यांनी केली होती. मात्र राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे प्रशासन भारताबरोबर मुक्त व्यापारी करारासाठी पुढाकार घ्यायला तयार नाही. सध्या दुसऱ्या कुठल्याही देशाशी असा करार करायचा नाही, असे धोरण या प्रशासनाने स्वीकारले आहे. याचा दाखला देऊन भारताच्या व्यापारमंत्र्यांनी अमेरिका व भारतामध्ये मुक्त व्यापारी करार संभवत नसल्याचे स्पष्ट केले. पण जर अमेरिकेने आपल्या धोरणात बदल केला, तर भारत त्याला निश्चितच प्रतिसाद देईल, असेही व्यापारमंत्री गोयल पुढे म्हणाले.

राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन अमेरिकेची आधीची धोरणेच पुढे राबवित असून यामध्ये अमेरिकेच्या युरोपिय देशांबरोबरील सहकार्याला ते सर्वाधिक महत्त्व देतात. बायडेन राष्ट्राध्यक्षपदावर येण्याच्या आधीच काही विश्लेषकांनी त्यांच्या या धोरणांची जाणीव करून दिली होती. त्यामुळे चीनचा अपवाद वगळता भारत तसेच इतर आशियाई देशांबरोबरील व्यापारी संबंधांना बायडेन विशेष महत्त्व देत नसल्याचे दिसते. भारताबरोबरील सहकार्याचे कितीही मोठे दावे केले, तरी प्रत्यक्षात त्यांचे प्रशासन भारताबरोबरील व्यापारासाठी फार मोठे निर्णय घेण्यास तयार झालेले नाही. भारताबरोबरील मुक्त व्यापारी करारबाबत बायडेन प्रशासनाकडून दाखविण्यात येत असलेली अनास्था हा देखील त्याचाच भाग ठरतो.

दरम्यान, व्यापारमंत्री पियूष गोयल ‘इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फोरम-आयपीईएफ’च्या बैठकीसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या संघटनेची संकल्पना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीच मांडली होती. जागतिक पातळीवर सतत समोर येत असलेल्या आव्हानांचा विचार करता पर्यायी पुरवठा साखळी उभी करण्यासाठी या बैठकीत चर्चा होईल. विशेषतः जागतिक उत्पादनाचे केंद्र चीनमध्ये असल्याने निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उत्पादनासाठी आवश्यक पर्यायी पुरवठा साखळी तयार करण्यावर आयपीईएफवर विचारविनिमय अपेक्षित आहे. यासाठी बायडेन प्रशासनाने पुढाकार घेतला असला, तरी ठोस पावले उचलण्यासाठी बायडेन प्रशासन तितकेसे प्रसिद्ध नाही.

leave a reply