पाश्चिमात्य देशांनी निर्बंध काढले तर इराण युरोपिय देशांची इंधन गरज भागवेल

- इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचा प्रस्ताव

इंधन गरजतेहरान – ‘इराणने दिलेल्या प्रस्तावाप्रमाणे, अमेरिका आणि युरोपिय देशांनी यशस्वी अणुकरार केला आणि इराणवरील सर्व निर्बंध काढून घेतले तर युरोपिय देशांची इंधनाची गरज इराण भागवेल’, अशी घोषणा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. या वाटाघाटीतील इराणची भूमिका पूर्ण झाली असून आता अमेरिकेला निर्णय घ्यायचा आहे, असे सांगून इराणने बायडेन प्रशासानावरील दडपण वाढविले. इराणच्या अणुकराराच्या मुद्यावर इस्रायल अमेरिकेवरील दबाव वाढवित असल्याचा दावा इस्रायलच्या पंतप्रधानांनी केला होता. त्यानंतर इराणने हा दावा केला आहे.

गेल्या महिन्यात व्हिएन्ना येथे युरोपिय महासंघाच्या मध्यस्थीने अमेरिका आणि इराणच्या प्रतिनिधींची तातडीची अप्रत्यक्ष बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर महासंघाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख जोसेफ बोरेल यांनी अमेरिका व इराणला अणुकराराबाबत आपला निर्णय कळविण्याची सूचना केली होती. गेल्या आठवड्यात इराणने महासंघाकडे अणुकरारासाठी आपला प्रस्ताव सुपूर्द केला होता. इराणचा हा प्रस्ताव अणुकरार मागे खेचणारा असल्याची नाराजी अमेरिका आणि युरोपिय महासंघाने व्यक्त केली होती.

पण आत्तापर्यंत आपल्या प्रस्तावावर बोलण्याचे टाळणाऱ्या इराणने सोमवारी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ‘2015 सालचा अणुकरार पुनर्जिवित करण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी इराणचे सरकार आणि इराणींवर लादलेले सारे निर्बंध काढून घ्यावे, ही आमची प्रमुख मागणी आहे. व्हिएन्ना येथील शेवटच्या बैठकीनंतर इराणने युरोपिय महासंघाला पाठविलेल्या प्रस्तावात हीच मागणी केली आहे’, अशी माहिती इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासिर कानी यांनी दिली.

इंधन गरजत्याचबरोबर, ‘जगभरातील वेगवेगळ्या देशांची इंधन आणि नैसर्गिक वायूची मागणी पूर्ण करणारा इराण हा महत्त्वाचा देश आहे. पाश्चिमात्य देशांच्या कठोर निर्बंधांखाली असतानाही इराणने आपले हे सामर्थ्य आणि क्षमता अबाधित ठेवली होती. सध्या युरोपिय देश इंधनाच्या टंचाईला सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत अणुकरारावरील वाटाघाटी यशस्वी ठरल्या आणि इराण निर्बंधमुक्त झाला तर युरोपची इंधनाची मोठी निकड इराण भागवू शकतो’, असा दावा कानी यांनी केला.

हा अणुकरार करण्याआधी बायडेन प्रशासनाकडून इराणला हमी आवश्यक आहे. कारण हमी नसेल तर अमेरिका पुन्हा एकदा अणुकराराचे उल्लंघन करू शकतो, असा ठपका इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने ठेवला. तसेच इराणने या अणुकरारासाठी आवश्यक भूमिका पार पाडली असून आता अमेरिकेवर अणुकरार यशस्वी करण्याचा निर्णय अवलंबून आहे. अमेरिकेकडे राजकीय इच्छाशक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता असेल तर नक्कीच अणुकरार यशस्वी होईल, अशी प्र्रतिक्रिया इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

बायडेन प्रशासनाकडे अणुकरार करण्याची निर्णय क्षमता नाही म्हणून ते दिरंगाई करीत असल्याचा आरोप इराणची माध्यमे करीत आहेत. तसेच पाश्चिमात्य देशांनी अणुकराराबाबत चालढकल केली तर इराण वेगळ्या पर्यायांचा वापर करू शकतो, असा इशारा इराणचे नेते देत आहेत. इराणचा अधिकार डावलणारा आणि मर्यादा ओलांडणारा कुठलाही अणुकरार केला जाणार नसल्याचेही इराणचे नेते बजावत आहेत.

युक्रेनच्या युद्धामुळे अमेरिकेने रशियाच्या इंधन निर्यातीला लक्ष्य करण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कडाडलेले आहेत. अशा परिस्थितीत इराणचे इंधन बाजारात आले तर त्यामुळे इंधनाच्या दरावर नियंत्रण राखणे सोपे जाऊ शकते. यासाठी अमेरिका व युरोपिय देश इराणबरोबर अणुकरारासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या गरजेची जाणीव इराणला झालेली असून यामुळेच इराण आपल्या मागण्या अधिक ठामपणे पुढे रेटत असल्याचे दिसते. अमेरिकेबरोबर अणुकरारावर वाटाघाटी सुरू असताना, इराणने रशियाबरोबर चर्चा करून अमेरिकेवरील दडपण अधिकच वाढविले होते.

leave a reply