कझाकस्तानातील हिंसाचारामागे तुर्कीचा हात

- दंगल भडकावणाऱ्या गुन्हेगारांच्या म्होरक्याने कबुली दिली

तुर्कीचा हातनूर सुल्तान – गेल्या आठवड्यात कझाकस्तानात हिंसाचार भडकवून सत्तापालट करण्याच्या कारस्थानामध्ये तुर्कीचा हात असल्याची माहिती समोर येत आहे. कझाकस्तानच्या गुन्हेगारी विश्‍वाचा नेता अरमान डिके याने तुर्कीचे परराष्ट्रमंत्री मेवलूत कावुसोग्लू यांच्याशी आपला संपर्क होता याची कबुली दिली. कझाकस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी गेल्या आठवड्यातच अरमानला ताब्यात घेतले होते. यामुळे तुर्कीला धक्का बसला असून रशियाबरोबरच्या संबंधावरही परिणाम होण्याचा दावा केला जातो.

गेल्या आठवड्यात कझाकस्तानमध्ये राष्ट्राध्यक्ष कॅसिम-जोमार्ट तोकायेव यांच्याविरोधात भडकवलेल्या दंगलींमध्ये 164 जणांचा बळी गेला तर हजारांहून अधिक जण जखमी झाले. परदेशी दहशतवाद्यांनी कझाकस्तानात अराजक माजवून सत्तापालट करण्याचा सुनियोजित डाव आखल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी केला होता. त्यानंतर रशियाप्रणित ‘कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रिटी ऑर्गनायझेशन-सीएसटीओ` या माजी सोव्हिएत देशांच्या लष्कराचे सहाय्य घेऊन कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी या हिंसाचारावर नियंत्रण मिळविले.

आठवड्याभराच्या हिंसाचारानंतर कझाकस्तान आता कुठे पूर्वपदावर येत आहे. त्याचबरोबर या हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्यांना अटक व त्यांना सहाय्य करणाऱ्या परदेशी हस्तकांचे नावे देखील कझाकस्तानचे सरकार उघड करीत आहे. याप्रकरणी गेल्या आठवड्यात 7 जानेवारी रोजी कझाकस्तानातील गुन्हेगारी विश्‍वाचा नेता अरमान डिके याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून तुर्कीचे विद्यमान परराष्ट्रमंत्री मेवलूत कावुसोग्लू यांच्याबरोबर अरमानची असलेली जवळीक उघड झाली आहे.

अरमान आणि कावुसोग्लू यांचा फोटोग्राफ आखाती माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला. त्याचबरोबर तुर्कीमधील माफिया डॉन सेदात पेकेर, अल्लातीन काकिची यांच्याबरोबरच्या सहकार्याची अरमानने कबुली दिली. यापैकी पेकेर हा तुर्कीच्या नेत्यांबरोबर अंमली पदार्थांची तस्करी, पैशाचे गैरव्यवहार, वेश्‍याव्यवसाय आणि शस्त्रास्त्रांच्या तस्करीत सहभागी असल्याचे याआधीच उघड झाले होते. त्यामुळे कझाकस्तानातील हिंसाचारामागे तुर्कीचा मोठा सहभाग असल्याचा दावा केला जातो.

तुर्कीबरोबर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील कट्टरपंथिय गट देखील हा हिंसाचार भडकविण्यामागे असल्याचे कझाकस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी म्हटले होते. ‘युरेशियन` यंत्रणा देखील कझाकस्तानच्या हिंसाचारात तुर्कीतील कट्टरपंथियांच्या सहभागाचे संकेत देत आहेत. या घटनेची सखोल चौकशी सुरू असून लवकरच आणखी तपशील समोर येतील, असे बोलले जाते.

काही दिवसांपूर्वी कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी देखील ‘सीएसटीओ`च्या बैठकीत बोलताना आपल्या देशातील अराजकामध्ये मध्य आशियाई, आखाती व अफगाणिस्तानचे संबंध असल्याचा ठपका ठेवला होता. लवकरच याचे पुरावे जगासमोर उघड करण्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी केली होती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी देखील कझाकस्तान तसेच माजी सोव्हिएत देशांमधील सरकारे उधळण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नसल्याचे जाहीर केले होते.

तुर्कीचा हातकझाकस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष नूर सुल्तान नझरबायेव्ह यांच्याबरोबर तुर्कीचे सहकार्य होते. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी नूर सुल्तान यांच्यासाथीने तुर्की भाषिक देशांचा प्रभावशाली गट तयार करण्यासाठी हालचाली वाढविल्या होत्या. यात माजी सोव्हिएत देशांचा समावेश असल्यामुळे रशिया नाराज झाला होता. पण नूर सुल्तान यांच्यानंतर कझाकस्तानच्या सत्तेवर आलेल्या राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी तुर्कीपेक्षा रशियाबरोबरच्या संबंधाना अधिक महत्त्व दिले.

दरम्यान, गेल्या आठवड्यातच देशातील हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपावरुन राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी दहशतवादविरोधी पथकाचा माजी प्रमुख मासिमोव यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली. तर माजी राष्ट्राध्यक्ष नुर सुल्तान यांना राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या प्रमुखपदावरुन काढून टाकले. अशा परिस्थितीत, अरमान याच्या कबुलीमुळे तुर्कीला जबर धक्का बसला असून यामुळे कझाकस्तान-रशियाबरोबरील तुर्कीचे संबंध बिघडण्याची दाट शक्यता समोर येत आहे.

leave a reply