लिबियातील सैन्य तैनातीवरुन तुर्कीचा इजिप्तला इशारा

अंकारा/कैरो – लिबियातील संघर्षात जनरल हफ्तार यांच्या बंडखोरांना लष्करी सहाय्य पुरविणार्‍या इजिप्तला यासाठी जोरदार प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा तुर्कीने दिला. गेल्या महिन्यात इजिप्तच्या लढाऊ विमानांनी लिबियात चढविलेल्या हवाई हल्ल्यात तुर्कीचा लष्करी तळ उद्ध्वस्त केला होता. त्यावर तुर्कीची ही प्रतिक्रीया उमटल्याचे दिसत आहे. तर इजिप्त आणि फ्रान्सच्या नौदलाचा भूमध्य समुद्रातील सर्वात महत्त्वाचा युद्धसराव नुकताच पार पडला. हा युद्धसराव म्हणजे तुर्कीसाठी इशारा असल्याचा दावा केला जातो.

गेल्या काही वर्षांपासून सिरियात सुरू असलेला संघर्ष हळुहळू लिबियात सरकत असल्याचे दावे आंतरराष्ट्रीय विश्लेषक आणि माध्यमे करीत आहेत. लिबियात २०१५ सालापासून संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता असलेले सराज यांचे सरकार आणि जनरल खलिफा हफ्तार यांच्या बंडखोर संघटनेत संघर्ष सुरू आहे. लिबियातील इंधनाच्या साठ्यासाठी हा संघर्ष सुरू असल्याचा दावा केला जातो. लिबियातील कट्टरपंथीयांचे समर्थन असलेले सराज यांच्या सरकारला तुर्कीचा लष्करी पाठींबा आहे. लिबियाची राजधानी त्रिपोलीसह पश्चिमेकडील भागात तुर्कीचे सैनिक आणि सिरियातील तुर्की संलग्न कट्टरपंथी गट तैनात असल्याचे फोटोग्राफ्स देखील प्रसिद्ध झाले होत. तर रशिया, इजिप्त तसेच संयुक्त अरब अमिरात (युएई) हे लिबियातील हफ्तार बंडखोरांना लष्करी सहाय्य पुरवित असल्याचा दावा केला जातो.

रशियाने या संघर्षात आपले मर्सिनरीज उतरविल्याचा आरोप तुर्कीच्या माध्यमांनी केला होता. तर काही दिवसांपूर्वी इजिप्तच्या सरकारने लिबियात सैन्य उतरविण्याचे जाहीर केले. इंधनसंपन्न तसेच सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या सिरते या पूर्व लिबियातील शहराच्या सुरक्षेसाठी इजिप्तच्या सरकारने ही घोषणा केली होती. इजिप्तच्या संसदेने देखील लिबियातील या सैन्यतैनातीला मंजूरी दिली होती. या निर्णयामुळे खवळलेल्या तुर्कीने इजिप्तला गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. तुर्कीचे सुरक्षा सल्लागार इब्राहिम कालिन यांनी दोन दिवसांपूर्वी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत लिबियातील संघर्षात परदेशी लष्कराच्या वाढत्या सहभागावर जोरदार टीका केली.

इजिप्तच्या लष्कराने लिबियातील संघर्षात सहभाग घेतला तर या देशात शांती प्रस्थापित करण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरतील, असे कालिन यांनी बजावले. असे झाले तर, लिबियातील सैन्यतैनाती इजिप्तसाठी धोकादायक ठरेल, अशी धमकी कालिन यांनी दिली होती. त्याचबरोबर लिबियातील हफ्तार बंडखोरांचे समर्थन करणारे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यावरही कालिन यांनी टीका केली. फ़्रान्स लिबियातील सुरक्षा व शांती धोक्यात टाकत असल्याचा आरोप कालिन यांनी केला. तुर्कीने दिलेल्या या इशार्‍यानंतर पुढच्या काही तासात इजिप्त आणि फ्रान्सच्या नौदलाचा सराव पार पडला.

इजिप्तच्या लष्कराने प्रसिद्ध केलेल्या माहितीनूसार, इजिप्त आणि फ्रान्सच्या नौदलात भूमध्य समुद्रात पार पडलेल्या या युद्धसरावात दोन्ही देशांच्या आघाडीच्या विनाशिका तसेच लढाऊ विमानांनी सहभाग घेतला होता. यावेळी जमीन तसेच हवाई लक्ष्य भेदण्याचा सराव पार पडला. लिबियाच्या किनारपट्टीवरील सिरते शहराजवळ हा युद्धसराव पार पडला. लिबियातील सराज यांची राजवट व तुर्कीचे लष्कर या इंधनसंपन्न शहराचा ताबा घेण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. या पार्श्वभूमीवर, लिबियन बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या या शहराच्या सुरक्षेसाठी इजिप्त व फ्रान्सच्या नौदलात हा सराव पार पडल्याचा दावा केला जातो. हा युद्धसराव घेऊन इजिप्त आणि फ्रान्सने तुर्कीला सुस्पष्ट संदेश दिल्याचा दावा माध्यमे करीत आहेत. लिबियातील गृहयुद्धातील तुर्की आणि इजिप्तमधील तणावामागेही तसेच मोठे कारण असल्याचा दावा केला जातो.

काही दिवसांपूर्वी लिबियातील अल-वातिया तळावर झालेल्या हवाई हल्ल्यात सदर तळावर तैनात असलेले तुर्कीची एफ-१६ लढाऊ विमाने, ड्रोन्स, रडार तसेच हवाई सुरक्षा यंत्रणा नष्ट झाली होती. इजिप्तच्या वायुसेनेतील राफेल विमानांनी ही कारवाई केल्याचे बोलले जात होते. लिबियातील जनरल खलिफा हफ्तार यांच्या बंडखोर संघटनेच्या समर्थनार्थ इजिप्तने ही कारवाई केल्याचे बोलले जात होते. लिबियातील सराज यांची राजवट आणि तुर्कीच्या लष्कराची सिरतेवरील कारवाई रोखण्यासाठी इजिप्तने हे हल्ले चढविल्याचा दावा केला जातो. आपल्या लष्करी तळावर झालेल्या या हल्ल्यामुळे संतापलेल्या तुर्कीने इजिप्तला धमकावल्याचे दिसत आहे.

leave a reply