तुर्की रातोरात आकस्मिक हल्ला चढवून ग्रीसमध्ये दाखल होईल

- तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांची धमकी

आकस्मिक हल्लाप्राग – ‘आम्ही एका रात्री अचानक येऊन दाखल होऊ, असे तुर्कीने यापूर्वी बजावले आहे. आशा आहे की तुर्कीचा हा संदेश ग्रीस व इतर देशांना नीट समजला असेल’, अशी धमकी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी दिली. झेक रिपब्लिकची राजधानी प्रागमध्ये झालेल्या युरोपिय देशांच्या बैठकीतच एर्दोगन यांनी हा इशारा देऊन खळबळ उडवली आहे. गेल्याच महिन्यात, ग्रीसला उत्तर देताना सर्व ताकदीचा वापर केला जाईल, अशी धमकी तुर्कीने दिली होती.

प्रागमध्ये ‘युरोपियन पॉलिटिकल कम्युनिटी’च्या बैठकीत ग्रीससह युरोपिय देशांच्या उपस्थितीतच तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी या सर्वांना धमकावले. ‘ग्रीसचे संपूर्ण धोरण खोट्या गोष्टींवर आधारलेले आहे. ग्रीस हा प्रामाणिक देश नाही. त्यामुळे यापुढे तुर्कीला ग्रीसशी कोणतीही चर्चा करायची नाही. तुर्कीने यापूर्वी दिलेले इशारेही ग्रीसने गांभीर्याने घ्यावेत’, असे एर्दोगन यांनी बजावले.

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष ग्रीसला धमकावत असतानाच तुर्कीचे नौदल एजियन सीमध्ये ‘अंडरवॉटर सर्व्हिलन्स सिस्टिम’ तैनात करण्याच्या हालचाली करीत असल्याचे वृत्त ‘ग्रीक रिपोर्टर’ या वेबसाईटने दिले आहे. तुर्की ड्रोन्सच्या सहाय्याने या यंत्रणा एजियन सीमध्ये सक्रिय करणार असल्याचा दावा ग्रीसच्या वेबसाईटने केला. तुर्कीची ही यंत्रणा ग्रीक पाणबुड्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणार असल्याचेही वृत्तात सांगण्यात आले. तुर्कीचे संरक्षणमंत्री हुलुसी अकर यांनी, हवाईदल व नौदलाला ग्रीसविरोधात आवश्यक कारवाईचे आदेश दिल्याचे नुकतेच म्हटले होते. या पार्श्वभूमीवर ‘अंडरवॉटर सर्व्हिलन्स सिस्टिम’ची तैनाती लक्ष वेधून घेणारी ठरते.

आकस्मिक हल्लाग्रीस व तुर्कीमध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने तणाव चिघळताना दिसत आहे. या दोन देशांमध्ये असलेले एजियन समुद्र क्षेत्र हे वादाचे प्रमुख कारण ठरले आहे. तुर्कीच्या विनाशिका आणि गस्तीनौका ग्रीसच्या सागरी क्षेत्रात गस्त घालत आहेत. याद्वारे तुर्की ग्रीसच्या सार्वभौम सागरी क्षेत्राचा ताबा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ग्रीसने याआधी केला होता. तुर्कीच्या विनाशिकांच्या आक्रमकतेचा मुद्दा ग्रीसने युरोपिय महासंघ तसेच संयुक्त राष्ट्रसंघातही उपस्थित केला होता.

मात्र तुर्कीने आपल्यावरील आरोप फेटाळून ग्रीसवर एजियन समुद्राचे लष्करीकरण सुरू केल्याचा ठपका ठेवला होता. ग्रीसच्या लढाऊ विमानांनी तुर्कीच्या हवाईहद्दीतून धोकादायक उड्डाण केल्याची टीका तुर्कीने काही दिवसांपूर्वीच केली होती. तुर्कीच्या लष्कराने ड्रोन फोटोग्राफ्स प्रसिद्ध करून ग्रीसने एजियन बेटांवर लष्करी जमवाजमव केल्याचा आरोपही केला आहे. गेल्याच महिन्यात ग्रीसच्या लष्कराने एजियन बेटांवर नवी तैनाती केल्याचे तुर्कीच्या लष्कराचे म्हणणे आहे.

अमेरिकेने भेट म्हणून दिलेली लष्करी वाहने ग्रीसने या बेटांवर तैनात केल्याची टीका तुर्की लष्कराने केली. ग्रीसची ही कारवाई आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचे सांगून तुर्कीने संयुक्त राष्ट्रसंघाकडे त्याविरोधात तक्रार केली होती. त्याचवेळी तुर्कीचेे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी अधिक आक्रमक भूमिका स्वीकारून ग्रीसला इशारा दिल्याचे दिसत आहे. तसेच ग्रीसच्या मागे उभे राहणाऱ्या युरोपिय देशांनाही तुर्की धमकावत असल्याचे दिसते.

leave a reply