तुर्कीने ‘युएई’ला दिलेली धमकी खपवून घेणार नाही

‘जीसीसी’ने तुर्कीला खडसावले

रियाध – लिबियाप्रकरणी तुर्कीने ‘संयुक्त अरब अमिरात’ला (युएई) दिलेली धमकी अजिबात खपवून घेतली जाणार नसल्याचे, ‘गल्फ कोऑपरेशन कौंसिल’चे (जीसीसी) महासचिव डॉ. नईफ फलाह मुबारक अल हजरफ यांनी तुर्कीला बजावले आहे. त्याचबरोबर अरब देशांच्या अंतर्गत घडामोडींमध्ये परदेशी हस्तक्षेप सहन केला जाणार नसल्याचेही डॉ. नईफ म्हणाले. दोन आठवड्यांपूर्वी तुर्कीच्या संरक्षणमंत्र्यांनी लिबियातील लष्करी सहाय्याप्रकरणी युएई’ला परिणामांची धमकी दिली होती.

धमकी

पर्शियन आखातातील अरब देशांचा व्यापारी गट म्हणून ओळख असलेल्या ‘गल्फ कोऑपरेशन कौंसिल’चे (जीसीसी) महासचिव डॉ. नईफ फलाह मुबारक अल हजरफ यांनी दोन दिवसांपूर्वी तुर्कीचे सौदी अरेबियातील राजदूत एर्दोगन कोक यांची भेट घेतली. रियाध येथील ‘जीसीसी’च्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीत डॉ. नईफ यांनी तुर्कीच्या व्यवहारांवर टीका केली. पर्शियन आखात क्षेत्रात सुरक्षा आणि स्थैर्य कायम राखणे, यासाठी ‘जीसीसी’ प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर जीसीसी’च्या सदस्य देशांव्यतिरिक्त आखातातील इतर देशांसह सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी देखील आमचे प्रयत्न सुरू असतात. पण हे सहकार्य प्रस्थापित करीत असताना, संबंधित देशांच्या सार्वभौमत्त्वाचा आदर करुन त्यांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप केला जात नसल्याचे डॉ. नईफ यांनी स्पष्ट केले.

‘जीसीसी’च्या या भूमिकेचा तुर्कीने आदर करावा आणि अरब देशांच्या कारभारात हस्तक्षेप करू नये, असा टोला डॉ. नईफ यांनी लगावला. त्याचबरोबर ‘जीसीसी’चा सदस्य असलेल्या युएईला तुर्कीच्या नेत्याने दिलेली धमकी देखील सहन करणार नसल्याचा इशारा डॉ. नईफ यांनी दिला. तर ‘जीसीसी’ संयुक्त संरक्षण सहकार्यावर आधारीत असल्याचे सांगून डॉ. नईफ यांनी तुर्कीला अप्रत्यक्षरित्या बजावल्याचे दिसते. आठवड्यापूर्वीच जीसीसी’ने तुर्कीला अरब देशांच्या कारभारात ढवळाढवळ करू नका, असे बजावले होते. पण यावेळी या संघटनेने तुर्कीला प्रत्युत्तराचा इशारा दिल्याचे दिसत आहे.

दोन आठवड्यांपूर्वी लिबिया तसेच सिरियातील संघर्षात युएई तुर्कीच्या विरोधी गटाला करीत असलेल्या लष्करी सहाय्यावर संतापून तुर्कीचे संरक्षणमंत्री हुलूसी अकार यांनी युएईला धमकावले होते. ‘योग्य वेळी व योग्य ठिकाणी युएई’ला प्रत्युत्तर दिले जाईल, अशी धमकी अकार यांनी दिली होती. त्यावर जीसीसी’कडून ही प्रतिक्रिया उमटली आहे. दरम्यान, लिबियातील संघर्षात सराज राजवटीला सहाय्य करण्यासाठी तुर्कीची विनाशिका लिबियाच्या ’अल खुम्स’ येथील नौदल बंदरात दाखल झाली आहे. लिबियातील सरकारला तुर्कीकडून सुरू असलेल्या लष्करी सहाय्यावर याआधीच जर्मनी, फ्रान्स, ग्रीस, इजिप्त, युएई या देशांनी आक्षेप घेतला आहे.

leave a reply