ग्रीसविरोधात तुर्कीचा संयम संपत चालला आहे

- तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांचा इशारा

Erdoganअंकारा – ‘एजिअन समुद्रातील बेटांचा वापर करून ग्रीस तुर्कीच्या विमानांविरोधात कारवाया करीत आहे. ग्रीसच्या या कारवाया आव्हान देणाऱ्या असून आता तुर्कीचा संयम संपत चालला आहे. योग्य वेळी तुर्की ग्रीसला योग्य ते उत्तर देईल’, असा इशारा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी दिला. तुर्कीच्या या इशाऱ्यामुळे युरोपाते नवा संघर्ष पेटण्याच्या बेतात असल्याची चिंता माध्यमे व्यक्त करीत आहेत.

युक्रेनचे युद्ध पेटलेले असताना ग्रीस व तुर्कीमधील तणावही वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून तुर्कीची लष्करी विमाने एजिअन समुद्रातील वादग्रस्त हवाई क्षेत्रातून गस्त घालत असल्याचा आरोप ग्रीस करीत आहे. तर आपल्या एफ-१६ विमानांविरोधात ग्रीसचे लष्कर हवाई सुरक्षा रडार यंत्रणेचा वापर करीत असल्याची तुर्कीची तक्रार आहे. दोन दिवसांपूर्वीच तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी एजिअन समुद्रातील तणावासाठी ग्रीसला मोठी किंमत चुकवावी लागेल, असे धमकावले होते. त्यानंतर युरोपिय महासंघाने तुर्कीचे राष्ट्राध्यक्षांचे कान उपटले होते.

greece mitsotakisपण पुढच्या चोविस तासात राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी ग्रीसला नवा इशारा दिला. ‘तुर्कीच्या विमानांवर रडार रोखून ग्रीसने चांगले केलेले नाही. एजिअन समुद्रातील बेटांचा वापर करून ग्रीस तुर्कीला धमकावत आहे. यापुढेही अशा बेकायदेशीर कारवाया सुरू राहिल्या तर तुर्कीचा संयम संपेल. त्यानंतर योग्य वेळी ग्रीसला उत्तर दिले जाईल’, असे एर्दोगन म्हणाले. तुर्कीने याबाबतची आपली भूमिका संयुक्त राष्ट्रसंघ, नाटो व युरोपिय महासंघासमोरही मांडली आहे.

तुर्कीने दिलेल्या या धमकीवर ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मिसोताकिस यांनी टीका केली. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष धमक्यांबरोबर ग्रीसच्या सार्वभौमत्वावर प्रश्न उपस्थित करीत असल्याचा ठपका पंतप्रधान मिसोताकिस यांनी ठेवला.

दरम्यान, गेल्या वर्षापासून अमेरिकेने एजिअन समुद्रातील ग्रीसच्या बेटांचा लष्करी तळ म्हणून वापर करण्यास सुरुवात केली आहे. येथील अमेरिकेची लष्करी उपस्थिती आणि फ्रान्सचे ग्रीसला लष्करी सहाय्य यामुळे या क्षेत्रातील लष्करी समतोल बिघडत असल्याचा आरोप तुर्की करीत आहे. अमेरिका आणि तुर्कीचे बिघडलेले संबंध या क्षेत्रातील तणाव वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याची टीका तुर्कीची माध्यमे करीत आहेत.

leave a reply