दोन दशकानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानच्या बगराम हवाई तळाचा ताबा सोडला

काबुल – अफगाणिस्तानातील अमेरिकेचे मुख्यकेंद्र असलेल्या बगराम हवाईतळाचा ताबा अमेरिकेने सोडला. दहशतवादविरोधी कारवाईत महत्त्वाची भूमिका पार पाडणार्‍या अफगाणिस्तानातील या सर्वात मोठ्या तळाचा ताबा सोडून अमेरिकेने अफगाणिस्तानातील माघार पूर्ण होत आल्याचे संकेत दिले आहेत. तालिबानचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याने याचे स्वागत केले.

2001 साली अमेरिकेने अफगाणिस्तानात दहशतवादविरोधी युद्ध छेडल्यापासून बगराम हवाईतळ अमेरिका व नाटोच्या लष्कराचा मुख्य तळ बनला होता. अफगाणिस्तानातील तालिबान, अल-कायदा विरोधी कारवाईचे नियंत्रण या तळावरुन केले जात होते. म्हणून तालिबानने या तळावर हल्ला चढविणारे अनेकवार प्रयत्न केले, पण त्यात तालिबानला यश मिळाले नव्हते. अशा परिस्थितीत, बगरामचा ताबा सोडून अमेरिकेने अफगाणिस्तानातील सैन्यमाघार जवळपास पूर्ण झाल्याचे संकेत दिले, असे आंतरराष्ट्रीय माध्यमे सांगत आहेत.

यापुढे अफगाणी लष्कराकडे या तळाची सूत्रे असतील. शनिवारी अधिकृतरित्या या तळाची किल्ली अफगाणी लष्कराकडे सोपविण्यात येईल. दरम्यान, दोन दशकानंतर अमेरिका व नाटो लष्कराने बगरामचा ताबा सोडल्यामुळे अफगाणी तसेच आंतरराष्ट्रीय विश्लेषक चिंता व्यक्त करीत आहेत. अमेरिकेने बगराम हवाईतळाचा ताबा सोडणे म्हणजे तालिबानसमोर अफगाणिस्तानला एकटे सोडण्यासारखे असल्याचा दावा आस्ट्रेलियातील अफगाण विषयक विश्लेषक निशांक मोटवानी यांनी केला. त्याचबरोबर, ‘गेल्या 20 वर्षांपासून ज्या अफगाणिस्तानची सुरक्षा आपण केली, तो देश जळताना, तेथील जनता होरपळताना, अमेरिका व नाटोचे जवान घरी पोहोचल्यावर पाहतील’, असा इशारा मोटवानी यांनी दिला आहे.

leave a reply