वॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिकी नौदलाच्या सातव्या आरमाराचा भाग असलेल्या ‘युएसएस जॉन फिन’ या विनाशिकेने बुधवारी तैवानच्या सामुद्रधुनीतून गस्त घातली. अमेरिकेच्या या विनाशिकेवर टेहळणी करण्यासाठी चीननेही आपली विनाशिका धाडल्याचे उघड झाले आहे. चीनचे ‘आसियन’साठीचे राजदूत डेंग शिजून यांनी याची माहिती दिली असून, अमेरिका जाणूनबुजून या क्षेत्रात तणाव निर्माण करीत असल्याचा आरोप केला.
अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन चीनबाबत बोटचेपे धोरण स्वीकारतील अशी टीका अमेरिकेतील विरोधक तसेच परदेशी विश्लेषक करीत आहेत. बायडेन प्रशासनातील वरिष्ठ मंत्री व अधिकारी गेले काही आठवडे चीनला इशारे देत असले तरी प्रत्यक्षात चीनविरोधात कारवाई होणार नाही, असे आरोपही करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकी नौदलाने ‘फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन’ मोहिमेअंतर्गत तैवानच्या सामुद्रधुनीत विनाशिका धाडणे लक्ष वेधून घेणारे ठरते.
बायडेन यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर अमेरिकी नौदलाने तैवाननजिकच्या सागरी क्षेत्रात विनाशिका धाडण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेने ‘युएसएस जॉन मॅक्केन’ व ‘युएसएस कर्टिस विल्बर’ या दोन विनाशिका तैवानच्या सामुद्रधुनीत गस्ती मोहिमेसाठी पाठविल्या होत्या. या मोहिमांवर चीनने तीव्र आक्षेप नोंदविले होते. बुधवारी अमेरिकेने आपली विनाशिका धाडल्यानंतर त्यावर नजर ठेवण्यासाठी चीननेही आपली विनाशिका पाठविल्याचे समोर आले.
अमेरिकेची विनाशिका तैवाननजिकच्या ‘बाशी चॅनल’ या सागरी क्षेत्रात असताना याच भागात चीनची ‘जिनान’ ही विनाशिकाही फिरत होती, अशी माहिती तैवानने दिली आहे. काही तासांसाठी अमेरिका व
चीनची विनाशिका एकाच सागरी क्षेत्रात एकाच दिशेने प्रवास करीत होत्या, असा दावाही तैवानच्या लष्करी सूत्रांनी केला. तैवानच्या या दाव्याला चीनचे ‘आसियन’साठी नेमण्यात आलेले राजदूत डेंग शिजून यांच्या पोस्टमुळे दुजोरा मिळाला आहे.
शिजून यांनी आपल्या पोस्टमध्ये, चिनी नौदलाच्या ईस्टर्न कमांडने अमेरिकी विनाशिका ‘युएसएस जॉन फिन’च्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी युद्धनौका धाडल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी अमेरिका या क्षेत्रात तणाव निर्माण करीत असून क्षेत्रिय शांतता व स्थैर्य बिघडवित आहे, असा आरोपही केला. दरम्यान, चीननेही अमेरिकी विनाशिकेच्या मोहिमेविरोधात आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
चीनचे जवान सर्व प्रकारच्या धमक्या व चिथावणीला प्रत्युत्तर देण्यास सज्ज असून सागरी क्षेत्रातील तुकड्या हाय अॅलर्टवर आहेत, असे चीनकडून बजावण्यात आले आहे.