अमेरिकेच्या हस्तक्षेपाने युक्रेनमधील संघर्ष अधिकच भडकेल

झेलेन्स्की यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रशियन राजदूतांचा इशारा

anatoly-antonovवॉशिंग्टन/किव्ह – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचा अमेरिका दौरा म्हणजे ‘हॉलिवूड स्टाईल ट्रिप’ होती, अशी खिल्ली उडवित अमेरिकेचा युक्रेनमधील हस्तक्षेपाने संघर्ष अधिकच भडकेल, असा इशारा रशियाचे अमेरिकेचे राजदूत ॲनातोली ॲन्टोनोव्ह यांनी दिला. अमेरिकेने दिलेली पॅट्रियॉट क्षेपणास्त्रे व त्यांच्याबरोबर तैनात जवानांचे काय होणार आहे याची सर्वांनाच जाणीव आहे, अशी धमकीही रशियन राजदूतांनी दिली. रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह तसेच परराष्ट्र विभागानेही झेलेन्स्की यांच्या अमेरिका दौऱ्यावर कडाडून टीका केली आहे.

बुधवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचा धावता दौरा केला. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तसेच अमेरिकेच्या संसदेलाही संबोधित केले. यावेळी त्यांनी अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीला पराभूत केले होते, याची आठवण करून देत रशियाविरोधातील युद्धात कोणत्याही प्रकारची तडजोड नको, असे बजावले. अमेरिकेकडून युक्रेनला करण्यात येणारे अर्थसहाय्य व शस्त्रपुरवठा म्हणजे ‘चॅरिटी’ नसून जागतिक सुरक्षा व लोकशाहीसाठी करण्यात येणारी गुंतवणूक असल्याचा दावा युक्रेनी राष्ट्राध्यक्षांनी केला. बायडेन व झेलेन्स्की यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान, अमेरिकेकडून युक्रेनला ‘पॅट्रियॉट’ क्षेपणास्त्रांसह 1.85 अब्ज डॉलर्सच्या नव्या शस्त्रपुरवठ्याची घोषणा करण्यात आली.

conflict in Ukraineया घोषणेनंतर अमेरिकेने युक्रेनला केलेल्या शस्त्रसहाय्याचे मूल्य 20 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. पुढील काळात युक्रेन अमेरिकेकडून अधिकाधिक शस्त्रसहाय्याची अपेक्षा करीत असल्याचेही राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यावेळी म्हणाले. अमेरिका व युरोपिय देशांनी युक्रेनला अविरत शस्त्रपुरवठ्याची आश्वासने दिली असली तरी प्रत्यक्षात पुढील वर्षापासून हा पुरवठा घटण्याचे संकेत मिळत आहेत. असे झाल्यास रशियाविरोधातील युक्रेनच्या लढ्याला जबरदस्त धक्का बसू शकतो. हे टाळण्यासाठीच झेलेन्स्की यांनी युद्ध ऐन भरात असताना अमेरिकेचा दौरा केल्याचा दावा विश्लेषकांकडून करण्यात येतो. मात्र पॅट्रियॉटनंतर युक्रेनला अधिक प्रगत यंत्रणा मिळणार नसल्याचे बायडेन प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचे संकेतही अमेरिकी सूत्रांनी दिले आहेत.

झेलेन्स्की यांचा दौरा व अमेरिकेची शस्त्रसहाय्याची घोषणा यामुळे दोन्ही देशांना शांतता प्रस्थापित करण्यात स्वारस्य उरले नसल्याचे स्पष्ट झाले आहे, असा टोला रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी लगावला. तर पाश्चिमात्य आघाडी रशियाविरोधात दीर्घकालिन संघर्षाची तयार करीत असल्याचे झेलेन्स्की यांच्या दौऱ्यावरून दिसून येते, असे रशियाच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मारिआ झाखारोवा यांनी बजावले.

leave a reply