तालिबानच्या हाती गेलेल्या शस्त्रास्त्रांप्रकरणी अमेरिकन सिनेटर्सनी बायडेन प्रशासनाला खडसावले

बायडेन प्रशासनालावॉशिंग्टन – सुपर टूकानो विमाने, ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स, चिलखती हमवी वाहने, एम4 कार्बाईन्स, एम16 रायफल्स आणि असाच अब्जावधी डॉलर्सचा अमेरिकी शस्त्रसाठा तालिबानच्या हाती पडला आहे. तालिबानचे दहशतवादी ठिकठिकाणी एके-47 रायफल्स सोडून अमेरिकी शस्त्रास्त्रांनी सज्ज बनल्याचे माध्यमांमधून समोर येत आहे. बायडेन यांच्या सैन्यमाघारीच्या निर्णयामुळे अमेरिकी करदात्यांच्या पैशाने खरेदी केलेली शस्त्रास्त्रे तालिबानच्या हाती पडल्याची जळजळीत टीका होत आहे. अमेरिकेच्या 25 सिनेटर्सनी याप्रकरणी बायडेन प्रशासनाला जाब विचारला आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यावर महाभियोग चालविण्याची मागणी झाली होती.

अफगाणिस्तानात तालिबानला मिळालेले हे यश अफगाण सरकार, त्यांचे लष्कर आणि अफगाणी जनतेचे अपयश असल्याचे सांगून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी आपली जबाबदारी झटकली होती. बायडेन यांच्या या विधानांवर अमेरिकेतूनच जोरदार टीका झाली. अफगाणिस्तानातील ही सैन्यमाघार अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणी घटना असल्याचे ताशेरे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओढले होते. त्यातच गेल्या काही दिवसांमध्ये शस्त्रसज्ज तालिबानी दहशतवाद्यांचे फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर अमेरिकन जनतेचा संताप उफाळून वर आला आहे.

बायडेन प्रशासनालाअमेरिकी जवान वापरत असलेले तसेच अफगाणी जवानांना भेट म्हणून दिलेल्या पिस्तूल्स, रायफल्स, बंदूका, नाईट व्हिजन गॉगल्स, क्षेपणास्त्रे, लष्करी वाहने असा मोठा शस्त्रसाठा तालिबानी वापरत आहेत. तर त्याआधी अमेरिकी जवानांच्या वेगवान माघारीमुळे सुपर टूकानो विमाने, ब्लॅक हॉक्स हेलिकॉप्टर्स, स्कॅनइगल ड्रोन्स तालिबानच्या हाती पडल्याचे समोर आले होते. ही विमाने वापरण्यासाठी तालिबानकडे वैमानिक नसल्याचा दावा काही विश्‍लेषकांनी केला होता. पण तालिबानच्या दहशतवाद्यांनी हेलिकॉप्टर्स उडवित असल्याचे व्हिडिओ प्रसिद्ध केल्यामुळे लष्करी विश्‍लेषकांच्या चिंता वाढल्या होत्या.

या पार्श्‍वभूमीवर, टेड क्रूझ, मार्को रुबियो, बिल कॅसिडी आणि अन्य 22 सिनेटर्सनी चिंता व्यक्त करणारे आणि जाब विचारणारे पत्र अमेरिकेचे संक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांना पाठविले. अतिशय बेजबाबदार सैन्यमाघारीमुळे अमेरिकी करदात्यांच्या पैशांनी खरेदी केलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे तालिबान व तालिबानच्या सहकारी दहशतवादी संघटनांच्या हाती गेल्याची टीका या पत्रात आहे. बायडेन प्रशासनाने या सर्व प्रकारणाची जबाबदारी स्वीकारून यावर सविस्तर खुलासा करावा, अशी मागणी या सिनेटर्सनी केली.

बायडेन प्रशासनालाअफगाणिस्तानातून माघार घेण्याआधी या शस्त्रास्त्रांचा बंदोबस्त करणे ही अमेरिकेच्या संरक्षण विभागाची प्राथमिकता असायला हवी होती, अशी अपेक्षा या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षभरात अमेरिकेने अफगणी लष्कराला किती शस्त्रास्त्रे पुरविली, याचे तपशीलही या पत्रात मागितले आहेत. अफगाणिस्तानातील या परिस्थितीसाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे कमकुवत नेतृत्व जबाबदार असल्याचा आरोप करून विरोधकांनी बायडेन यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच बायडेन यांच्यामुळे चीन आणि रशियाला जबरदस्त लाभ मिळेल, असा आरोप माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला होता. त्यानंतर बायडेन यांच्यावर महाभियोग चालविण्याची मागणी अधिकच तीव्र झाली होती.

काही महिन्यांपूर्वी बायडेन यांचे जोरदार समर्थन करणाऱ्या माध्यमांचे गट देखील आता त्यांच्यावर टीका करू लागले आहेत. अमेरिकन जनमत बायडेन यांच्या विरोधात जात असून आजच्या काळात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाली तर डोनाल्ड ट्रम्प बायडेन यांना सहजतेने पराभूत करतील, असा दावा काही वृत्तसंस्थांनी केला आहे.

leave a reply