इस्रायलमधील उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर युएईने इस्रायलबरोबरचे लष्करी सहकार्य रोखले

तेहरान – ‘संयुक्त अरब अमिरात-युएई’ने जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या इस्रायलच्या प्रगत क्षेपणास्त्र यंत्रणेच्या खरेदीची प्रक्रिया थांबविली आहे. यासाठी गेल्या काही आठवड्यांपासून इस्रायलमध्ये सुरू असलेल्या घडामोडी कारणीभूत असल्याचा दावा अरबी वृत्तसंस्थेने केला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याविरोधात इस्रायलमध्ये सुरू असलेली निदर्शने तसेच वेस्ट बँकमधील इस्रायली लष्कराच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर, युएईने हा निर्णय घेतल्याचे अरबी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी सौदी अरेबियाने देखील इस्रायली अधिकाऱ्यांना व्हिसा देण्याचे नाकारले होते.

इस्रायलमधील उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर युएईने इस्रायलबरोबरचे लष्करी सहकार्य रोखलेगेल्या काही दिवसांपासून इस्रायलमध्ये नेत्यान्याहू सरकारविरोधात आंदोलन पेटले आहे. पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी न्यायालयाच्या व्यवस्थेत फेररचना सुचविली आहे. इराण तसेच दहशतवादी संघटनांवरील कारवाईसाठी हे बदल आवश्यक असल्याचे इस्रायलच्या सरकारचे म्हणणे आहे. पण याद्वारे पंतप्रधान नेत्यान्याहू इस्रायलवर आपली पकड बसविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विरोधी गट करीत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान येर लॅपिड यांच्या नेतृत्वाखाली तसेच अमेरिकेतील गटांच्या समर्थनासह इस्रायलमध्ये नेत्यान्याहू सरकारविरोधात जोरदार निदर्शने सुरू आहेत.

तर गेल्या तीन महिन्यांपासून इस्रायलच्या लष्कराने वेस्ट बँकमधील हमास, इस्लामिक जिहाद तसेच अन्य दहशतवादी संघटनांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. इस्रायलमधील उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर युएईने इस्रायलबरोबरचे लष्करी सहकार्य रोखलेइस्रायली लष्कराच्या हल्ल्यात पॅलेस्टिनींचा बळी गेल्याचा आरोप हमास, इस्लामिक जिहाद तसेच इराण, लेबेनॉन करीत आहे. पण इस्रायलच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरणारे हमास व अन्य संघटनांच्या दहशतवाद्यांनाच आपण लक्ष्य केल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. इस्रायलच्या या कारवाईवर इजिप्त, जॉर्डन या सहकारी देशांबरोबर अरब देशांच्या ‘जीसीसी’ने देखील टीका केली आहे.

अशा परिस्थितीत, युएईने इस्रायलकडून प्रगत क्षेपणास्त्र यंत्रणेच्या खरेदीची प्रक्रिया रोखल्याचे अरबी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. युएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झाएद अल नह्यान यांनी हे आदेश दिल्याचे या वृत्तसंस्थेचे म्हणणे आहे. पण दुसरीकडे इस्रायल तसेच सात अरब मित्रदेशांबरोबरची बैठक मंगळवारपासून युएईची राजधानी अबु धाबी येथे सुरू होत आहे.

हिंदी

 

leave a reply