इराण-सौदीमध्ये समेट झाला तरी येमेनी बंडखोर संघर्ष करीत राहतील

- हौथी बंडखोरांचा इशारा

कैरो/सना – चीनच्या मध्यस्थीने सौदी अरेबिया आणि इराणमध्ये चर्चा सुरू होत आहे. यामुळे सिरिया, इराक आणि येमेन या देशांमध्ये सुरू असलेले सौदी व इराणसमर्थक गटांमध्ये सुरू असलेला संघर्ष थांबेल, असे दावे करण्यात आले होते. मात्र सौदी व इराणमधील सहमतीचा येमेनमधील आपल्या कारवायांवर परिणाम होणार नाही, असा इशारा हौथी बंडखोरांनी दिला आहे. इराण-सौदी सहकार्याशी आमचा काहीही संबंध नाही, आम्ही त्याला बांधिल नाही, असे येमेनी बंडखोरांनी म्हटले आहे. त्यामुळे येमेनमधील सौदीसमर्थक सरकारबरोबरील हौथी बंडखोरांचा रक्तरंजित संघर्ष यापुढेही सुरू राहणार असल्याचे दिसत आहे.

इराण-सौदीमध्ये समेट झाला तरी येमेनी बंडखोर संघर्ष करीत राहतील - हौथी बंडखोरांचा इशारा२०१४ सालापासून येमेनमध्ये गृहयुद्ध भडकले आहे. सौदी अरेबिया व अरब मित्रदेशांचा पाठिंबा असलेल्या येमेनमधील हादी सरकार आणि इराणसंलग्न हौथी बंडखोरांमध्ये हा संघर्ष सुरू आहे. गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने हादी सरकार आणि हौथी बंडखोरांमध्ये संघर्षबंदी घडविली. पण यानंतरही या दोन्ही गटांमधील संघर्ष थांबलेला नाही. गेल्या साडे आठ वर्षांच्या संघर्षात ३ लाख, ७७ हजार जणांचा बळी गेला तर ४० लाख जण विस्थापित झाले. तर ८५ हजारांहून अधिक मुले उपासमारीला सामोरे जात असल्याची टीका होत आहे.

येमेनच्या सत्तेसाठी हादी सरकार आणि हौथी बंडखोरांमधील या गृहयुद्धाच्या आडून सौदी व इराण यांच्यात छुपे युद्ध सुरू असल्याचा दावा केला जातो. सौदी व अरब मित्रदेश उघडपणे हादी सरकारच्या समर्थनार्थ येमेनमधील हौथी बंडखोरांवर हवाई हल्ले चढविले होते. तर इराणने जाहीररित्या नाकारले असले तरी इराणची जहाजे हौथी बंडखोरांसाठी शस्त्रसाठा नेत असलेल्या बोटींना सौदी व्यतिरिक्त अमेरिका व ब्रिटनच्या जहाजांनी ताब्यात घेतले होते. त्याचबरोबर हौथींनी येमेन तसेच सौदीवरील हल्ल्यांसाठी इराणी बनावटीचे ड्रोन्स व क्षेपणास्त्रे वापरल्याचे पुरावे सौदीने सादर केले होते.

इराण-सौदीमध्ये समेट झाला तरी येमेनी बंडखोर संघर्ष करीत राहतील - हौथी बंडखोरांचा इशारासौदी व इराणमधील या छुप्या संघर्षामुळे पर्शियन आखात ते रेड सी या सागरी व्यापारी मार्गाची सुरक्षा धोक्यात आल्याचे अमेरिकेतील विश्लेषकांनी बजावले होते. हौथी बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे येत्या काळात सौदी व इराणमध्ये थेट संघर्षाचा भडका उडू शकतो, असा दावा या विश्लेषकांनी केला होता. अशा परिस्थितीत चीनच्या मध्यस्थीने सौदी व इराणमध्ये चर्चा पार पडली. या यशस्वी बैठकीनंतर दोन्ही देशांमधील संबंध पूर्ववत होतील, असा दावा चीनने केला होता. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या चर्चेचा दाखला देऊन चीनने जागतिक स्तरावर मोठी भूमिका स्वीकारावी, अशी घोषणाही केली होती.

आखातातील अनेक वादग्रस्त मुद्दे तसेच संघर्ष संपुष्टात येईल, असा दावा चीनच्या माध्यमांनी केला होता. तर संयुक्त राष्ट्रसंघातील इराणचे राजनैतिक अधिकारी देखील सौदीबरोबरच्या सहकार्यामुळे इतर वाद निकालात निघतील, असा विश्वास व्यक्त करीत आहेत. सिरिया, इराक व येमेन या देशांमधील इराण तसेच सौदीशी संलग्न असलेल्या संघटनांमध्ये सहकार्य प्रस्थापित होईल, असा दावा इराणी अधिकारी करीत आहेत.
मात्र येमेनमधील हौथी बंडखोरांची याबाबत सर्वात भिन्न भूमिका आहे. आपली संघटना इराणशी संलग्न नसल्याचे सांगून हौथी बंडखोरांनी येमेनमधील सौदीसमर्थक सरकारवरील हल्ले सुरू राहणार असल्याचे जाहीर केले. तसेच थेट उल्लेख केला नसला तरी सौदीवरील हल्ल्यांमध्ये फरक पडणार नसल्याचा इशारा हौथी बंडखोरांनी दिला. हौथी बंडखोरांची ही घोषणा इराणबरोबरच चीनला हादरा देणारी ठरते.

हिंदी

 

leave a reply