ब्रिटनकडून हाँगकाँगवासियांसाठी ‘नागरिकत्व व्हिसा’ची अंमलबजावणी सुरू

लंडन/बीजिंग – हाँगकाँगमधून बाहेर पडून ब्रिटनमध्ये आश्रय घेण्यासाठी उत्सुक असलेल्या नागरिकांसाठी ‘सिटिझनशिप व्हिसा’ योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्याची घोषणा ब्रिटीश सरकारने केली आहे. हाँगकाँगमध्ये वास्तव्यास असणार्‍या व ब्रिटनचा पासपोर्ट बाळगणार्‍या नागरिकांसाठी हा नवा मार्ग खुला करून देत असल्याचा मला अभिमान आहे, अशा शब्दात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नवी योजना कार्यरत झाल्याचे जाहीर केले. ब्रिटनच्या या योजनेने बिथरलेल्या चीनने हाँगकाँगमध्ये राहणार्‍यांचे ब्रिटीश पासपोर्ट वैध धरण्यात येणार नाहीत, असे बजावले आहे. चीनच्या या निर्णयामुळे ब्रिटन व चीनमधील राजनैतिक संघर्ष चिघळण्याचे संकेत मिळत आहेत.

चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने गेल्या वर्षी जुलै महिन्यात हाँगकाँगवर ‘नॅशनल सिक्युरिटी लॉ’ लादला होता. या कायद्यानुसार, चीनच्या विरोधात करण्यात येणारे कोणतेही कृत्य बेकायदेशीर व राष्ट्रविरोधी ठरवण्यात आले असून, असे कृत्य करणार्‍यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याची तरतूद आहे. या कायद्यानुसार अटक केलेल्या हाँगकाँगच्या नागरिकांवर कोणतेही स्थानिक कायदे लागू होणार नसून, नव्या कायद्याअंतर्गत दाखल होणारे खटले गुप्त पद्धतीने चालविण्याची परवानगीही संबंधित यंत्रणांना देण्यात आली आहे. चीनने लादलेल्या या नव्या कायद्याविरोधात हाँगकाँगसह आंतरराष्ट्रीय स्तरावरुन तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

चीनच्या या दडपशाहीविरोधात ब्रिटनने आक्रमक भूमिका घेत हाँगकाँगवासियांना ब्रिटीश नागरिकत्वाचे दरवाजे खुले असल्याचे जाहीर केले होते. ब्रिटन व चीनमध्ये झालेल्या करारानुसार, हाँगकाँगमधील लाखो नागरिकांना ब्रिटीश पासपोर्ट ठेवण्याची परवानगी आहे. या नागरिकांना ब्रिटीश नागरिकत्व सहजगत्या उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा ब्रिटनने गेल्या वर्षी केली होती. त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून जवळपास तीन लाख नागरिकांना ही सुविधा उपलब्ध होईल, असे सांगण्यात येते.

ब्रिटनकडून या योजनेला सुरुवात होण्यापूर्वी जवळपास सात हजार हाँगकाँगवासियांनी ब्रिटनमध्ये आश्रय घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना एक वर्षात ब्रिटनचे नागरिकत्व मिळेल, अशी तरतूद नव्या योजनेत आहे. हाँगकाँगसाठी लागू असणार्‍या ‘सिटिझनशिप व्हिसा’ योजनेसाठी संख्येची मर्यादा नसल्याचे ब्रिटनने आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यात हाँगकाँगमधील ब्रिटीश पासपोर्ट असणारे नागरिक हजारोंच्या संख्येने ब्रिटनमध्ये दाखल होतील, असे मानले जाते.

हाँगकाँगवासियांसाठी दरवाजे खुले करणार्‍या ब्रिटनच्या योजनेविरोधात चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. चीनचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी यापुढे हाँगकाँगमधील ब्रिटीश पासपोर्ट वैध धरले जाणार नाहीत, असे सांगून ब्रिटनला इशारा दिला आहे. ब्रिटनने चीनबरोबर झालेल्या करारातील तरतुदींचे उल्लंघन केल्याचा आरोपही चिनी प्रवक्त्यांनी केला.

leave a reply