ब्रिटन लोकशाहीवादी भारताशी सहकार्य दृढ करील

- ब्रिटनच्या नव्या परराष्ट्रमंत्र्यांची घोषणा

लंडन – ‘‘ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिकेमधील ‘ऑकस’ हे लष्करी संघटन ऑस्ट्रेलियाची व्यापारी वाहतूक सुरक्षित करण्यासाठी आहे. मात्र ब्रिटनला इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील हुकूमशाहीवादी देशांना रोखण्यासाठी ब्रिटनला भारताबरोबर व्यापारी व सुरक्षाविषयक सहकार्य वाढवायचे आहे’’, असे ब्रिटनच्या नव्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस यांनी स्पष्ट केले. ऑकसच्या सहकार्याचा भारताबरोबरील सहकार्यावर विपरित परिणाम होणार नाही, हे ऑस्ट्रेलिया व अमेरिकेबरोबरच आता ब्रिटनही आवर्जुन सांगत आहे. ब्रिटनच्या नव्या परराष्ट्रमंत्र्यांनी ही बाब अधोरेखित केल्याचे दिसते.

ब्रिटन लोकशाहीवादी भारताशी सहकार्य दृढ करील - ब्रिटनच्या नव्या परराष्ट्रमंत्र्यांची घोषणाइंडो-पॅसिफिक क्षेत्रातील लोकशाहीवादी देशांबरोबर ब्रिटनला व्यापार व सुरक्षाविषयक संबंध दृढ करायचे आहेत. यामध्ये भारत, जपान व कॅनडा या देशांचा समावेश आहे, असे परराष्ट्रमंत्री ट्रुस यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. याआधी ब्रिटनच्या व्यापारमंत्री पदावर असलेल्या लिझ ट्रुस यांनी भारत व ब्रिटनमधील मुक्त व्यापारी करारासाठी प्रयत्न केले होते. त्याचा दाखला देऊन ट्रुस यांनी भारताबरोबरील ब्रिटनच्या संबंधांचे महत्त्व आपल्याला पुरतेपणे ठाऊक आहे, असे ट्रुस यांनी स्पष्ट केले.

भारतासारख्या लोकशाहीवर प्रेम करणार्‍या देशाबरोबर सहकार्य प्रस्थापित करून ब्रिटन दुष्ट हेतू असणार्‍या देशांच्या विरोधात भक्कम आघाडी उभी करील. यामध्ये दृढ व्यापारी व लष्करी सहकार्याचा समावेश असेल, असा दावा परराष्ट्रमंत्री ट्रुस यांनी या मुलाखतीत केला. याचा अर्थ ब्रिटन चीनला रोखण्यासाठी प्रयत्न करणार का? असा प्रश्‍न यावेळी मुलाखतकाराने केला. त्यावर बोलताना ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आम्ही लोकशाहीचा पुरस्कार करू, असे सूचक उत्तर दिले.

हॉंगकॉंगमधील लोकशाहीवादी निदर्शकांवर कठोर कारवाई करणार्‍या चीनबरोबरील ब्रिटनचे संबंध ताणले गेले आहेत. तर चीन साऊथ चायना सी क्षेत्रातील ब्रिटनच्या विमानवाहू युद्धनौकाची गस्त चीनच्या संतापाचा विषय बनला आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच, ब्रिटनने ऑकस संघटनेत सहभागी होऊन चीनला रोखण्यासाठी आपण महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यास तयार असल्याचा संदेश दिला. हे लष्करी संघटन आपल्याच विरोधात असल्याची चीन सांगत आहे. मात्र असे असले तरी भारताबरोबरील संबंधांना ब्रिटन महत्त्व देत आहे, हे या देशाच्या नव्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस सांगत आहेत.

leave a reply