मॉस्को – रशियाच्या क्रेमलिनवरील ड्रोन हल्ल्यामुळे युक्रेनच्या युद्धाचा अधिक भयंकर टप्पा सुरू झाल्याची चिंता जगभरात व्यक्त करण्यात येत आहे. क्रेमलिनवरील हल्ल्याबरोबरच युक्रेनने क्रिमिआ आणि ब्रिआन्स्कवर हल्ले चढवून आपली क्षमता दाखवून दिली. रशियाच्या ताब्यात असलेल्या क्रिमिआमध्ये ऑईल डेपोवर युक्रेनचा ड्रोन हल्ला झाला. तसेच ब्रिआन्स्कमध्ये पुन्हा एकदा रशियाच्या रेल्वेला लक्ष्य केले. रशियन लष्करासाठी वाहतूक करणारी ही रेल्वे रुळावरून घसरली व इथे लागलेल्या आगीत रशियाचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. हा युक्रेनी लष्कराच्या प्रतिहल्ल्याचा भाग असल्याची चिन्हे दिसत आहेत.
रशिया व युक्रेनमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये हल्ले-प्रतिहल्ल्यांचे मोठे सत्र सुरू झाल्याचे दिसत आहे. रशियाकडून युक्रेनवर करण्यात येणाऱ्या हल्ल्यांची तीव्रता सातत्याने वाढत आहे. युक्रेनच्या ईशान्य भागातील खार्किव्हपासून ते दक्षिणेतील ओडेसा प्रांतापर्यंतच्या विविध भागांना रशियाकडून लक्ष्य करण्यात आले. यासाठी तोफा, रणगाडे, रॉकेटस्, क्षेपणास्त्रे व ड्रोन्सचा वापर करण्यात आला आहे.
या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना युक्रेनने रशियन हद्दीतील भागांवर हल्ले करण्यास प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. युक्रेन हद्दीनजिक असलेल्या क्रिमिआ तसेच ब्रिआन्स्क प्रांतांना सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. गेल्या आठवड्याभरात युक्रेनने क्रिमिआ प्रांतात तीन ड्रोन हल्ले चढविले आहेत.
तर गेल्या ७२ तासांमध्ये दोनदा ब्रिआन्स्क प्रांतात घातपाती हल्ले करण्यात आले. रशियन लष्कराच्या रसदीसाठी ब्रिआन्स्क प्रांतातील मार्ग महत्वाचे मानले जातात. त्यांना लक्ष्य करून रशियन लष्कराला धक्का देण्याचे प्रयत्न युक्रेनकडून करण्यात येत आहेत.
दुसऱ्या बाजूला रशियाने ताब्यात घेतलेला क्रिमिआ प्रांत पुन्हा ताब्यात घेण्याचे इरादे युक्रेनच्या राजवटीने वारंवार व्यक्त केले आहेत. नवी प्रतिहल्ल्यांची मोहीम क्रिमिआ ताब्यात घेण्यासाठीच असल्याचे दावेही करण्यात येतात. त्यामुळे क्रिमिआतील हल्ल्यांवर युक्रनने लक्ष केंद्रित केले आहे.
मात्र या हल्ल्यानंतर रशिया युक्रेनवरील हवाई हल्ले तसेच क्षेपणास्त्रे व रॉकेट्सचा मारा अधिकच वाढविणार असून याचे स्पष्ट संकेत आत्तापासूनच मिळू लागले आहेत. युक्रेनच्या खेर्सनमध्ये रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात १६ जणांचा बळी गेल्याचा दावा केला जातो. ही प्राथमिक पातळीवरील माहिती असून या हल्ल्याची तीव्रता पाहता, यामध्ये युक्रेनची अधिक हानी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे युक्रेनच्या युद्ध अधिकच रक्तरंजित बनणार असल्याची चिंता प्रत्यक्षात उतरू लागल्याचे दावे केले जातात.
हिंदी