रशियाविरोधातील प्रतिहल्ल्याच्या मोहिमेत सहा हजार किलोमीटर्सचे क्षेत्र ताब्यात घेतल्याचा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा दावा

सहा हजारकिव्ह/मॉस्को – रशियन फौजांवर युक्रेनकडून सुरू असणाऱ्या प्रतिहल्ल्यांची धार अधिकच वाढल्याचे संकेत मिळत आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला चालू केलेल्या मोहिमेनंतर गेल्या १२ दिवसांमध्ये रशियाच्या ताब्यातील सहा हजार चौरस किलोमीटर्सच्या परिसरावर पुन्हा नियंत्रण मिळविल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केला आहे. यात खार्किव्हसह दक्षिण युक्रेनमधील भागांचाही समावेश असल्याचे झेलेन्स्की यांनी सांगितले. युक्रेनला मिळत असलेल्या या यशाच्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य देशांनी दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे पुरवावीत, अशी आग्रही मागणी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केली आहे. दरम्यान, खार्किव्हमधील माघारीवरून टीका होत असतानाही युक्रेनमधील मोहिमेत बदल होणार नाहीत, अशी माहिती रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी दिली.

सहा हजारगेल्या काही दिवसात युक्रेनच्या लष्कराला खार्किव्ह प्रांतात मोठे यश मिळाल्याचे समोर आले आहे. या भागात तैनात रशियन लष्करी तुकड्यांनी माघार घेतली असून शेकडो जवानांना युद्धकैदी म्हणून ताब्यात घेण्यात आल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले. युक्रेनच्या फौजा रशियाच्या सीमेवर पोहोचल्याचे दावेही करण्यात आले आहेत. रशियन लष्कर आपली शस्त्रे, रणगाडे व इतर सामुग्री टाकून पळाल्याचे फोटोग्राफ्स युक्रेनसह आंतरराष्ट्रीय माध्यमांनी प्रसिद्ध केले आहेत. रशियन वर्तुळातही या माघारीवरून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून रशियातील काही नेते तसेच राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या समर्थकांनी मोठ्या फेरबदलांची मागणी पुढे केल्याचे सांगण्यात येते. या पार्श्वभूमीवर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेला दावा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

सहा हजार‘सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून युक्रेनच्या लष्कराने सहा हजार चौरस किलोमीटर्सचा भूभाग मुक्त करण्यात यश मिळविले आहे. यात पूर्व तसेच दक्षिण युक्रेनमधील भागांचा समावेश आहे. युक्रेनी लष्कर पुढे आगेकूच करीत आहे’, असा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला. झेलेन्स्की यांच्या या दाव्यावर अमेरिकेकडून प्रतिक्रिया उमटली. प्रतिहल्ल्याची मोहीम आताच सुरू झाली असली तरी युक्रेनी लष्कराने केलेली प्रगती लक्षणीय ठरते, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे. दरम्यान, युक्रेनी लष्कराला मिळालेल्या यशानंतर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा अधिक शस्त्रे पुरविण्याची मागणी पुढे केली आहे. युक्रेनी राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेकडे दीर्घ पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची मागणी केल्याचा दावा अमेरिकी माध्यमांनी केला आहे. युरोपिय देशांकडेही युक्रेनने अधिक शस्त्रांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तर खार्किव्हमध्ये बसलेल्या धक्क्यानंतरही रशियाची युक्रेनमधील मोहीम व त्याची उद्दिष्टे यात कोणतेही बदल होणार नसल्याचा खुलासा रशियाचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी केला. खार्किव्हमधील माघारीनंतर संतापलेल्या काही रशियन नेते व लष्करी अधिकाऱ्यांनी थेट युद्धाची घोषणा करून लष्करी हालचाल सुरू करावी, अशी मागणी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे पेस्कोव्ह यांनी स्पष्ट केले.

leave a reply