चीन व रशियाचे अधिक न्याय्य जागतिक व्यवस्थेला आकार देण्याचे प्रयत्न

- वरिष्ठ चिनी नेते यांग जिएची

चीन व रशियाबीजिंग/मॉस्को – ‘राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या मार्गदर्शनाखाली चीन व रशियामधील संबंध योग्य मार्गावरून पुढे जात आहेत. दोन देशांमधील उच्चस्तरीय धोरणात्मक सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी चीन रशियाबरोबर सक्रिय पावले उचलण्यास तयार आहे. दोन्ही देशांमधील सामायिक हितसंबंधांची सुरक्षा आणि अधिक न्याय्य व योग्य दिशेने जाणारी जागतिक व्यवस्था विकसित करण्यासाठी चीन रशियाला सहाय्य करेल’, असा दावा चीनचे वरिष्ठ नेते यांग जिएची यांनी केला. येत्या काही दिवसात चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग रशियन राष्ट्राध्यक्षांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येते. या पार्श्वभूमीवर जिएची यांनी केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते.

गेल्या काही वर्षात रशिया व चीन या देशांमधील जवळीक अधिक वाढत असल्याचे समोर येत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी यासाठी पुढाकार घेतला असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मुद्यांवर दोन्ही देशांनी परस्परांना समर्थन देणारी भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. आर्थिक, व्यापारी तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातही दोन्ही देशांमधील सहकार्य नव्या उंचीवर जात असल्याचे संकेत मिळत आहेत. काही महिन्यांपूर्वी रशियाने युक्रेनमध्ये सुरू केलेल्या लष्करी मोहिमेनंतर चीनने रशियाच्या विरोधात भूमिका घेण्याचे नाकारले होते. त्याचवेळी इंधन व इतर पातळ्यांवर चीन रशियाला सहकार्य करीत असून पाश्चिमात्य देशांनी रशियावर लादलेल्या निर्बंधांनाही चीनने विरोध केला. त्याचवेळी पाश्चिमात्य देशांनी तैवानबाबत स्वीकारलेल्या धोरणावर रशियाने टीकास्त्र सोडले असून चीनला पाठिंबा दिला आहे.

चीन व रशियारशिया व चीनच्या या वाढत्या सहकार्यामागे अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांविरोधात उभारण्यात येणारी आघाडी हा प्रमुख घटक ठरला आहे. रशियाने पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांना प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकी चलन डॉलरच्या वर्चस्वाला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी स्थानिक चलनांसह चीनच्या युआन चलनाला प्राधान्य दिले आहे. युक्रेनमधील संघर्षाच्या माध्यमातून रशिया अमेरिका व युरोपिय देशांची लष्करी संघटना असणाऱ्या नाटोला आव्हान देत असल्याचे दिसत आहे. तर अमेरिका व युरोपिय देशांकडून तैवानसह इतर मुद्यांवर राबविण्यात येणाऱ्या धोरणाला चीनचा विरोध असून या देशाने तंत्रज्ञान व अंतराळ क्षेत्रातही अमेरिकेला हादरे दिले आहेत. हे दोन्ही देश विविध आंतरराष्ट्रीय गटांच्या माध्यमातून अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांच्या व्यवस्थेला पर्याय उभा करण्याचे प्रयत्न करीत असून जिएची यांचे वक्तव्य त्याला दुजोरा देणारे ठरते.

leave a reply